रशियाकडून डोन्बास क्षेत्रासह खेर्सन व झॅपोरिझिआमध्ये प्रखर हल्ले

मॉस्को/किव्ह – नव्या वर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली आहे. सलग दोन दिवस केलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर रशियाने डोन्बास क्षेत्रासह खेर्सन व झॅपोरिझिआत प्रखर हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये तोफा, रणगाडे, रॉकेट्स व मॉर्टर्सचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडे नव्या रणगाड्यांची मागणी केली आहे. तर नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी, रशिया व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना कमी लेखण्याचा धोका पत्करता येणार नाही, असा इशारा दिला.

डोन्बास क्षेत्रासह

रविवारी रात्री डोनेत्स्क प्रांतातील रशियन नियंत्रणाखालील माकिव्हका शहरात युक्रेनने जबरदस्त रॉकेट हल्ले चढविले होते. यात रशियाच्या अनेक जवानांचा बळी गेला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल रशियन लष्कराने डोनेत्स्क प्रांतामधील युक्रेनच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले असून त्यात सुमारे 350 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियन फौजा अधिकच आक्रमक झाल्या असून डोन्बास प्रांतातील तीन आघाड्यांवर मोठे हल्ले सुरू झाले आहेत. लिमन, बाखमत व ॲव्हडिव्हका या तिन्ही शहरांच्या परिसरात रशियाने गेल्या 24 तासात प्रचंड मारा केल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली.

डोन्बास क्षेत्रासह

रशियन लष्कराने या भागात नव्या लष्करी तुकड्या व शस्त्रसामुग्री तैनात केली असून त्या जोरावर हल्ले करण्यात येत आहेत. यात रणगाडे, तोफा, मॉर्टर्स, मल्टिपल-लाँच रॉकेट सिस्टिम्ससह क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला आहे. डोनेत्स्क प्रांतातील कॉस्टिआन्टिनिव्हका परिसरात रशियाने तीन क्षेपणास्त्रांसह 14 रॉकेटस्‌‍चा मारा केला. कुपिआन्स्क भागात रशिया लष्करी आघाडी अधिक भक्कम करण्याची तयारी करीत असल्याचेही सांगण्यात येते. रशियन फौजांनी गुरुवारी खेर्सन तसेच झॅपोरिझिआ भागातही घणाघाती मारा केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

डोन्बास क्षेत्रासह

पूर्व युक्रेनमध्ये रशियाकडून प्रखर हल्ले सुरू झाल्याने युक्रेनी फौजा चांगल्याच जेरीस आल्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी पूर्व युक्रेनमधील रशियन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून नवे रणगाडे व तोफांची मागणी केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी जर्मनी व अमेरिकेशीही यासंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त युक्रेनी यंत्रणांनी दिले आहे. अमेरिकेने युक्रेनला ‘ब्रॅडले’ ही सशस्त्र वाहने तर फ्रान्सने वजनाने हलके असलेले रणगाडे देण्याचे मान्य केल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, रशियन लष्कर व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना कमी लेखता येणार नाही असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. नॉर्वेतील एका परिषदेत स्टॉल्टनबर्ग यांनी हा इशारा देतानाच पुतिन यांनी त्यांच्या योजनेत बदल केल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info