बीजिंग – काही आठवड्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या देशाची प्रेमळ व विनम्र देश अशी प्रतिमा उभी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनानंतर काही दिवसातच चीनच्या संसदेत पाश्चात्य देशांकडून लादण्यात येणार्या निर्बंधांना प्रत्युत्तर देणारा कायदा संमत करण्यात आला. हा कायदा म्हणजे चीनच्या ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’चा भाग आहे, असा दावा विश्लेषक जिआन्ली यांग यांनी केला आहे.
गेल्या काही वर्षात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरात वर्चस्ववादी कारवायांना वेग देण्यात आला आहे. त्यात गेल्या वर्षी जगभरात फैलावलेली कोरोनाची साथ व उघुरवंशियांवरील अत्याचारांची भर पडली आहे. या प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. चीनची आक्रमकता व विस्तारवादी धोरणांविरोधात पाश्चात्य देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यात चीनविरोधातील व्यापक निर्बंधांचा समावेश आहे.
Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/china-using-wolf-warrior-diplomacy-against-foreign-sanctions/