पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रपुरवठ्यामुळे युक्रेन संघर्ष वेगळ्या स्तरावर जाईल

- रशियाचा पाश्चात्य देशांना इशारा

संघर्ष

मॉस्को/बर्लिन/किव्ह – ‘पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला सातत्याने करण्यात येणारा प्रचंड प्रमाणातील शस्त्रपुरवठा ही अत्यंत धोकादायक बाब ठरते. यामुळे सध्या सुरू असलेल्या संघर्ष पूर्णपणे वेगळ्या स्तरावर जाऊ शकतो. ही गोष्ट युरोपियन व जागतिक सुरक्षेसाठीही फारशी चांगली ठरणार नाही’, असा खरमरीत इशारा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनीही आक्रमक भूमिका घेत, कितीही शस्त्रे पुरविली तरी रशियाला पराभूत करणे शक्य नसल्याचे बजावले आहे. शुक्रवारी जर्मनीत युक्रेनला शस्त्रसहाय्य पुरविणाऱ्या देशांची बैठक झाली. या पार्श्वभूमीवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

शुक्रवारी जर्मनीतील रॅम्स्टेन एअरबेस या अमेरिकी तळावर युक्रेनला शस्त्रसहाय्य पुरविणाऱ्या ‘डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट ग्रुप’ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की व संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी पुन्हा एकदा वाढीव शस्त्रपुरवठ्याची मागणी केली.

रशियाचे टीकास्त्र

युक्रेनला अधिकाधिक हवाईसुरक्षा यंत्रणा, रणगाडे, तोफा, त्यासाठी लागणारी सामुग्री यांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अमेरिकेने रशिया पुन्हा नव्याने आक्रमणाची तयारी करीत असल्याचे सांगून युक्रेनला अधिक शस्त्रे देण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडला. त्याचवेळी जोपर्यंत युक्रेनला गरज आहे तोपर्यंत अमेरिका शस्त्रपुरवठा सुरू ठेवेल, अशी ग्वाहीदेखील दिली.

रशियाचे टीकास्त्र

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी अमेरिकेने युक्रेनला अडीच अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली. त्यात ‘स्ट्रायकर टँक्स’, ‘ब्रॅडले आर्मर्ड व्हेईकल्स’, ‘हायमार्स रॉकेटस्‌‍’ व इतर संरक्षणसामुग्रीचा समावेश आहे. या घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला केलेल्या शस्त्रपुरवठ्याचे मूल्य 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

अमेरिकेकडून नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा होत असतानाच ब्रिटननेही युक्रेनला 600 ‘प्रिसिजन गायडेड ब्रिम्स्टोन मिसाईल्स’ देण्याचे जाहीर केले आहे. तर फिनलँडने युक्रेनला 40 कोटी युरोच्या नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा केली. मात्र युक्रेनला रणगाडे पुरविण्यावरून अमेरिका व जर्मनीमध्ये असलेले मतभेद बैठकीदरम्यानही कायम असल्याचे समोर आले आहे.

रशियाचे टीकास्त्र

पाश्चिमात्य देशांच्या नव्या शस्त्रसहाय्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘पाश्चिमात्यांच्या नव्या शस्त्रपुरवठ्यामुळे परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. रशिया आपली उद्दिष्टे निश्चितपणे पूर्ण करील. अधिक शस्त्रे पुरविल्यास त्याचे परिणाम नकारात्मकच असतील. नव्या शस्त्रांमुळे युक्रेनच्या समस्यांमध्ये अधिकच वाढ होईल. काहीतरी मोठे बदल घडतील, असे चित्र उभे करून युक्रेनला शस्त्रपुरवठा वाढविण्यात आला आहे. पण हे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत’, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले.

‘पाश्चिमात्यांनी दिलेल्या शस्त्रांचा वापर युक्रेनने क्रिमिआवरील हल्ल्यांसाठी केला तर रशिया सडेतोड प्रत्युत्तर देईल. नाटोने युक्रेनला कितीही शस्त्रपुरवठा केला तरी रशिया ती सर्व शस्त्रे नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही. रशियाला हरविणे शक्य नाही’, असा इशारा रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी काही दिवसांपूर्वी युक्रेनला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावेळी झालेल्या गोपनीय बैठकांमध्ये रशियाच्या संभाव्य ‘स्प्रिंग ऑफेन्सिव्ह’वर चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info