जेरूसलेम – ‘इस्रायलच्या शत्रूंना लवकरच योग्य ती समज दिली जाईल. यापुढे हिंसा आणि रॉकेट्सचा वर्षाव सहन केला जाणार नाही. हमासच्या या रॉकेट हल्ल्यांबाबत इस्रायलचा संयम आता संपला आहे’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. त्याचबरोबर गाझातील पॅलेस्टिनींनी अगदी वेगळ्या इस्रायलसाठी तयार रहावे, असे सूचक उद्गार पंतप्रधान बेनेट यांनी काढले आहेत. यावर हमासने प्रतिक्रिया दिली असून इस्रायलचे पंतप्रधान आम्हाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप हमासने केला आहे.
गेल्या आठवड्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बेनेट यांनी रविवारी पहिल्यांदा इस्रायली जनतेला संबोधित केले. त्याचबरोबर, गाझापट्टीतून रॉकेट, मॉर्टर्स आणि काईट-बलून बॉम्बचे हल्ले चढविणार्या हमास, इस्लामिक जिहाद व इतर दहशतवादी संघटनांना इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला. गाझापट्टीतून इस्रायलवर होणार्या रॉकेट हल्ल्यांवर यापुढे अधिक आक्रमक कारवाईद्वारे उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान बेनेट यांनी बजावले. त्याचबरोबर गाझातील पॅलेस्टिनी जनतेचा मानवी ढाल म्हणून वापर करणार्या हमासवर इस्रायलच्या पंतप्रधानांनी टीका केली.
‘हमासच्या रॉकेट हल्ल्यांची झळ गाझातीलच काही शहरांना बसली आहे. गाझातील पॅलेस्टिनी जनता म्हणजे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत. गाझातील पॅलेस्टिनींप्रमाणे इस्रायलच्या स्देरॉत, ऍश्खेलॉन आणि कार अझा या शहरातील नागरिकांनाही शांततेने आणि सुरक्षित राहण्याचा तितकाच अधिकार आहे’, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले. इस्रायलींच्या सुरक्षेसाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचे सांगताना, पंतप्रधान बेनेट यांनी गाझातील पॅलेस्टिनींनी देखील यापुढे इस्रायलच्या आक्रमक भूमिकेची सवय लावून घेणे आवश्यक असल्याचे बजावले.
‘इस्रायलींना ठार करण्यासाठी जे शस्त्र उचलत नाहीत, त्यांना इजा करण्याचा इस्रायलचा कुठलाही हेतू नाही. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांनी ओलिस ठेवलेल्यांविषयीही इस्रायलला तिरस्कार वाटत नाही. पण इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविणार्या हमासबाबतचा संयम आता संपला आहे, एवढे नक्की’, असा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला. इस्रायली पंतप्रधानांच्या या इशार्यानंतर हमासची बेचैनी वाढली आहे.
हमासच्या नेत्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांच्या या इशार्यावर टीका केली. तसेच इस्रायल आम्हाला ब्लॅकमेल करीत असून इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी हमासच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याची घोषणा हमासचा नेता याह्या सिन्वर याने केली. गेल्या आठवड्यात गाझापट्टीत हवाई हल्ले चढवून इस्रायलने संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप सिन्वरने केला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |