‘तैवान स्ट्रेट’सह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात चीनकडून दीडशे ‘स्टेल्थ फायटर्स’ची तैनाती

‘ईस्ट चायना सी’

बीजिंग/तैपेई – चीनने तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ही विमाने इनर मंगोलिया, हेबेई, ईस्टर्न थिएटर कमांड व नॉर्दर्न थिएटर कमांडमधील तळांवर तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हाँगकाँगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. दोन दिवसांपूर्वीच, तैवानसमोर चीनबरोबरील विलिनीकरण हा एकमेव पर्याय असून तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण ठरेल, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला होता. या पार्श्‍वभूमीवर नव्या हालचाली लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात.

सध्या अमेरिका व चीनमध्ये जबरदस्त तणाव असून तैवान हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2019 साली एका कार्यक्रमात उघडपणे तैवान ताब्यात घेण्यासाठ सर्व पर्याय वापरले जातील, असा इशारा दिला होता. त्यानंतर चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांकडून सातत्याने धडका मारणे सुरू आहे. दुसर्‍या बाजूला अमेरिकेनेही मित्रदेशांसह या भागातील लष्करी वावर वाढवित चीनला स्पष्ट इशारा दिला आहे.

‘ईस्ट चायना सी’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक पातळीवर तसेच संरक्षणक्षेत्रात तैवानला मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे धोरण राबविले होते. अमेरिकेच्या या धोरणात, इंडो-पॅसिफिकमधील इतर प्रमुख देशांनीही तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याच्या मुद्याचा समावेश होता. त्यानुसार जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांनी तैवानबरोबर विविध पातळ्यांवर संबंध दृढ करण्यास सुरुवात केली आहे. तैवानच्या मुद्यावर संघर्ष भडकल्यास त्यात तैवानला समर्थन करण्याची भूमिका जपान व ऑस्ट्रेलियाने घेतली आहे. अवघ्या 24 तासांपूर्वीच जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानची सुरक्षा जपानशी जोडलेली आहे, असे बजावले होते.

‘ईस्ट चायना सी’

अमेरिकेपाठोपाठ इतर देशही तैवानच्या मुद्यावर आक्रमक होऊ लागल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे आता चीनने अमेरिकेपाठोपाठ इतर देशांनाही तैवानच्या मुद्यावरून धमकाविण्यास सुरुवात केली आहे. तैवान व ईस्ट चायना सी क्षेत्राशी निगडीत तळांवर एकसाथ 150 लढाऊ विमानांची तैनाती त्याचाच भाग ठरतो. ही तैनाती तैवानबरोबरच त्याला साथ देणार्‍या जपान व दक्षिण कोरिया यासारख्या देशांना दिलेला इशारा असल्याचा दावा ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात करण्यात आला आहे.

चीनकडून 150 लढाऊ विमानांच्या तैनातीचे वृत्त समोर येत असतानाच, शुक्रवारी तैवानच्या तटरक्षकदलात नवी ‘मिसाईल कॉर्व्हेट’ सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धनौकेवर ‘अँटीशिप मिसाईल्स’ अर्थात युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येतील, असे तैवानकडून सांगण्यात येते. तैवानच्या तटरक्षक दलात सामील होणारी ही दुसरी युद्धनौका असून अशा 12 युद्धनौका दलात सामील होणार आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info