युक्रेन युद्धात पाश्चिमात्यांच्या विरोधातील संघर्ष ही रशियाच्या अस्तित्त्वाची लढाई

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – एकेकाळी रशियन संघराज्य (सोव्हिएत युनियन) व आता रशिया म्हणून ओळखण्यात येणारा देश पूर्णपणे खिळखिळा करायचा हेच पाश्चिमात्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे, असा घणाघाती आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. युक्रेन युद्धात अमेरिका व युरोपिय देशांनी अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे ओतली असून रशिया फक्त युक्रेन नाही तर नाटोविरोधात लढतो आहे, याची जाणीव पुतिन यांनी करून दिली. त्यामुळे युक्रेनमधील युद्धात पाश्चिमात्यांच्या विरोधात होणारा संघर्ष ही रशियाच्या अस्तित्त्वाची लढाई असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला.

अस्तित्त्वाची लढाई

शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले असून रशियाला नियोजित लक्ष्य पूर्ण करता आले नसल्याचे दावे पाश्चिमात्य आघाडीकडून करण्यात येत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन अपयशी ठरल्याचे चित्रही पाश्चिमात्य माध्यमांनी रंगवायला सुरुवात केली आहे. राजधानी किव्हपर्यंत धडक मारलेल्या रशियन फौजांना युक्रेनी लष्कराने मागे लोटले असून क्रिमिआ पुन्हा ताब्यात घेण्याच्या वल्गना युक्रेनी राजवटीकडून करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, रशिया फक्त युक्रेन नाही तर संपूर्ण पाश्चिमात्य आघाडीविरोधात युद्ध लढत असल्याचा पुनरुच्चार केला.

अस्तित्त्वाची लढाई

‘रशियाचे विघटन घडवून त्यातील सर्व साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळविणे हा पाश्चिमात्यांचा एकमेव हेतू आहे. रशिया खिळखिळा केल्यावर रशियन समाजही दुभंगेल. मूळ रशियन वंशियांची असलेली बहुसंख्या नष्ट होईल. सध्या रशियन वंश व समाज ज्या स्थितीत आहे तसाच तो पुढे राहिल की नाही याबद्दल मला शंका आहे. अशा स्थितीत आल्यानंतर मग कदाचित पाश्चिमात्य आघाडी रशियाला स्वीकारेल’, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.

अस्तित्त्वाची लढाई

यावेळी त्यांनी नाटोच्या अण्वस्त्रक्षमतेकडेही लक्ष वेधले. सध्याच्या स्थितीत नाटोच्या सर्व सदस्य देशांनी त्यांचा एकमेव उद्देश रशियाचा सामरिकदृष्ट्या पराभव करणे हाच असल्याचे उघडपणे सांगितले आहे. अशा स्थितीत रशिया नाटोच्या एकत्रितरित्या असलेल्या आण्विक क्षमतेकडे दुर्लक्ष करु शकत नाही, याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले. यापुढे रशियाबरोबर अण्वस्त्रविषयक करार करायचा असेल तर त्यात फ्रान्स व ब्रिटनचाही समावेश करायला हवा, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

पुतिन यांच्याबरोबरच रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख असणाऱ्या दिमित्रि मेदवेदेव्ह यांनीही पाश्चिमात्य देशांवर टीकास्त्र सोडले. युक्रेन युद्धात रशियाला विविध शत्रूंचा समावेश असलेल्या साम्राज्याशी लढावे लागत आहे. यात युक्रेनियन्सबरोबरच युरोपिअन नवनाझी, अमेरिकन्स, अँग्लो-सॅक्सन्स व त्यांचे अंकित असणाऱ्या देशांचा समावेश आहे, असा दावा मेदवेदेव्ह यांनी केला. पृथ्वीवरून रशियाचे अस्तित्त्व नाहीसे करणे हा या शत्रूंचा हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरणार आहेत कारण रशिया अतिशय मजबूत देश आहे, याची जाणीवही मेदवेदेव्ह यांनी करून दिली.

English         हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info