इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांचा युएईचा ऐतिहासिक दौरा – अबु धाबीमध्ये इस्रायलचा दूतावास सुरू

अबु धाबी – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपीड मंगळवारी ‘संयुक्त अरब अमिरात-युएई’मध्ये दाखल झाले. यावेळी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अबु धाबीमध्ये आखातातील इस्रायलचे पहिले दूतावास सुरू केले. त्याचबरोबर ही एक ऐतिहासिक घटना असून आखातातील इतर देशांनीही इस्रायलबरोबरच्या चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन लॅपीड यांनी केले. इस्रायल आणि युएईमधील या सहकार्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे आभार मानले.

नऊ महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएई व बाहरिन यांच्यात राजकीय सहकार्य प्रस्थापित झाले होते. या सहकार्याला गती देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान युएईच्या दौर्‍यावर येणार होते. पण गाझापट्टीतील हमासच्या हल्ल्यानंतर नेत्यान्याहू यांना युएईचा दौरा पुढे ढकलावा लागला होता. मंगळवारी परराष्ट्रमंत्री लॅपीड यांनी अबु धाबी येथील दूतावासाचे उद्घाटन करताना, इस्रायल व अरब देशांमधील या सहकार्यासाठी ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/israeli-foreign-minister-historic-visit-to-the-uae/