ब्रुसेल्स/बीजिंग – झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या भेटीसंदर्भात युरोपिय महासंघाने घातलेल्या अटी अन्यायकारक असून महासंघाची यासंदर्भातील भूमिका दुटप्पी असल्याची टीका चीनने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अमेरिका व युरोपिय देशांकडून चीनने निष्पक्ष निरीक्षकांना झिंजिआंगमध्ये प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. मात्र चीनने चौकशीची मागणी फेटाळली असून ही भेट मैत्रीपूर्ण असावी, असे बजावले आहे.
काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेने झिंजिआंगमधील उघुरवंशियांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने तब्बल 11 लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर जगातील अधिकाधिक देश चीनकडून झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या कारवायांविरोधात उघड आवाज उठवित आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरांवर चाललेले अत्याचार म्हणजे वंशसंहार असल्याचा ठपका ठेवला आहे. इतर देशांमध्येही या स्वरुपाचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे.