नाटो जवानांच्या काबुलमधील तैनातीचे भीषण परिणाम होतील – तालिबानची अमेरिका, नाटोला धमकी

भीषण परिणाम

दोहा/काबुल – ‘अमेरिका आणि नाटोच्या सदस्य देशांनी कतारमध्ये झालेल्या कराराचे पालन करून अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी. 11 सप्टेंबर नंतर नाटोचा एक जवान काबुलमध्ये दिसला तर, त्याचे भीषण परिणाम होतील’, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहिन याने दिली. अमेरिकेने अफगाणिस्तानातील माघारीनंतरही काबुलमध्ये एक हजार जवान तैनात ठेवण्याचे जाहीर केले आहे. तर तुर्की आणि ब्रिटनने देखील आपले विशेष सुरक्षा पथक तैनात करण्याची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर, तालिबानने ही धमकी दिली आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातील सर्वात मोठा तळ बगरामची किल्ली अफगाणी लष्कराकडे सोपविली. अमेरिकेचे 50 टक्के जवान व शस्त्रास्त्रे विमानाने मायदेशी परतली असून उर्वरित जवान ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत माघार घेतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले. तरीही अफगाणिस्तानातील हवाई हल्ले सुरू ठेवण्यासाठी कतारमधून मोहीम राबविणार असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-threaten-nato-to-complete-all-troops-withdrawal-before-sept-11-deadline/