वॉशिंग्टन/मॉस्को – गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व रशियामध्ये वाढणारा तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. ‘ब्लॅक सी’मध्ये अमेरिका, युक्रेन व नाटो सदस्य देशांमध्ये करण्यात येणार्या युद्धसरावाला रशियाकडून तीव्र विरोध होत असून रशियाने आक्रमक हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. रशियाच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने ‘अॅम्फिबियस अॅसॉल्ट शिप’ ब्लॅक सी सागरी क्षेत्रात तैनात केली आहे. अमेरिकेच्या या कारवाईवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.
जून महिन्याच्या अखेरीस युक्रेन व नाटोच्या 30 सदस्य देशांमध्ये ‘सी ब्रीझ2021’ हा नौदल सराव सुरू झाला आहे. दोन आठवडे चालणार्या या सरावात 30 युद्धनौका, 40 लढाऊ विमाने व पाच हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. रशिया व पाश्चात्य देशांमध्ये विविध मुद्यांवर तणाव कायम असताना या सरावाचे आयोजन होत असल्याने रशियाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिका, युक्रेन व नाटोचा हा सराव म्हणजे रशियाविरोधातील उघड चिथावणी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.