काबुल – ‘अफगाणिस्तानात हिंसाचार माजविणार्या तालिबानच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराचे स्पेशल फोर्सेस प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरवित आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने तालिबानला स्नायपर रायफल्स देखील पुरविल्या. पण तालिबानच्या तुलनेत अफगाणी लष्कराकडे चांगल्या आणि प्रगत स्नायपर रायफल्स आहेत’, असा इशारा अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी दिला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला दिलेला हा दुसरा इशारा ठरतो. तालिबानबरोबरील सहकार्य कायम ठेवल्यास पाकिस्तानला जबर किंमत मोजावी लागेल, असे सालेह यांनी काही दिवसांपूर्वी बजावले होते.
अफगाण लष्कर आणि तालिबानमधील हिंसाचार तीव्र झाल्याचा दावा केला जातो. अफगाणी लष्कराने तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले असून याचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध केले. त्याचबरोबर काही ठिकाणी तालिबानच्या ताब्यात गेलेले जिल्हे व सुरक्षाचौक्या नियंत्रणाखाली आणल्याची घोषणा अफगाण संरक्षण मंत्रालयाने केली. या संघर्षात अफगाणिस्तानातील स्थानिक नेते, टोळीप्रमुख आणि स्त्रिया देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याच्या बातम्या येत आहेत.
उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी सोमवारी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये तालिबानविरोधी संघर्षात स्थानिकांकडून मिळणार्या पाठिंब्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांनी वेगाने सैन्यमाघार घेतल्यामुळे काही ठिकाणी पोकळी निर्माण झाली व त्याचा फायदा घेऊन तालिबानने या भागांचा कब्जा केल्याचे सालेह यांनी सांगितले. तालिबान पाकिस्तानी लष्कराच्या इशार्यावर काम करीत असल्याचा आरोप सालेह यांनी केला.
‘तालिबान तीन गटांमध्ये विभागलेली आहे. यातील एका गटाला पाकिस्तानी स्पेशल फोर्सेसकडून थेट प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत आहे. पाकिस्तानच्या पेशावर, क्वेट्टा आणि इतर भागांमधून तालिबानला सूचना दिल्या जातात’, असे सालेह म्हणाले. प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाबरोबर पाकिस्तानी लष्कराने तालिबानला स्नायपर रायफल्ससारखी शस्त्रे देखील पुरविली असल्याचे सालेह यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात अफगाणी लष्कराने तालिबानसह लढणार्या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्याला अटक केली होती. या अधिकार्याने देखील पाकिस्तानच्या पेशावर आणि खैबर-पख्तूनख्वा येथील पारचिनारच्या तळावर तालिबानच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळत असल्याची कबुली माध्यमांसमोर दिली होती. तसेच या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी व जवान आधीच तालिबानसोबत लढत असल्याचे या पाकिस्तानी अधिकार्याने म्हटले होते.
त्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला होता. पाकिस्तानने यापुढेही तालिबानला सहकार्य पुरविण्याचे सुरू ठेवले, तर त्याची जबर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, असे बजावले होते. तालिबानला सहाय्य पुरविणार्या पाकिस्तानच्या विरोधात अफगाणी जनतेमधील असंतोष तीव्र होत असल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |