टोकिओ – जपानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ‘व्हाईट पेपर’ अर्थात श्वेतपत्रक प्रसिद्ध केले. जपानच्या सरकारने यामार्फत पहिल्यांदाच तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून थेट चीनला धक्का दिला आहे. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणार्या चीनच्या लष्करी हालचाली धोकादायक आहेत. तैवानच्या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानच्या सुरक्षेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे’, अशा शब्दात जपानने तैवानच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
गेल्या काही वर्षांमध्ये जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध केला जाणारा व्हाईट पेपर संरक्षण सज्जता वाढविण्यावर भर देत आहे. चीन अधिकार सांगत असलेल्या सेंकाकू द्विपसमुहाच्या सुरक्षेसाठी जपानने आपली लष्करी सज्जता वाढविण्याचे धोरण जपानने गेल्या काही वर्षांपासून स्वीकारले होते. यावर चीनने वेळोवेळी आपला आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे यंदाच्या जपानच्या व्हाईट पेपरकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या होत्या.