बर्लिन – ‘नाटोच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणी जनतेची तालिबानकडून कत्तल होईल. अफगाणी महिला आणि मुलींना शब्दात वर्णन करता येणार नाहीत, अशा भयंकर यातना सहन कराव्या लागतील’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिला. याआधी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस आणि हिलरी क्लिंटन यांनीही अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचे विपरित परिणाम समोर येतील, असे बजावले होते. माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांनी या निर्णयासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर थेट टीका न करता, नाटोला सैन्यमाघारीच्या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.
9/11च्या हल्ल्यानंतर बुश यांनीच अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध छेडले होते. त्यामुळे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीवरून जॉर्ज बुश यांनी दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. विशेषतः अफगाणी जनतेची कत्तल व अफगाणी महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत बुश यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या राजवटीत अफगाणी महिलांना शिक्षण व इतर अधिकार दिले जातील, असे तालिबानच्या नेत्यांनी जाहीर केले होते खरे. पण आपल्या ताब्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या काही प्रांतात तालिबानने एकट्या महिलेला घराबाहेर पडण्याची परवानगी नाकारली आहे. इतकेच नाही तर तालिबानच्या दहशतवाद्यांसाठी 16 वर्षांवरील मुली व महिलांची नोंद करण्याची तयारी तालिबान करीत आहे. एका पाकिस्तानी महिला पत्रकारांनी ही माहिती दिली.
यामुळे तालिबानच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. काही तासांपूर्वी अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतात घडलेला व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर तालिबानच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार्यांवर टीका होत आहे. फरयाब प्रांतातील संघर्षात तालिबानला शरण आलेल्या अफगाणी लष्कराच्या 22 जवानांची दहशतवाद्यांनी क्रूरतेने गोळ्या घालून हत्या केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले. तर आणखी एका घटनेमध्ये तालिबानच्या दहशतवाद्याने अफगाणी जवानाचा शिरच्छेद केल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. तर महिन्याभरापूर्वी तालिबानने काबुल शहराजवळील मुलींच्या शाळांवर हल्ले घडविले होते. त्यामुळे महिला-मुलींच्या अधिकारांचे संरक्षण केले जातील, असे तालिबानने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात तालिबान अफगाणिस्तानात कट्टरपंथी राजवट आणण्याची तयारी करीत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना देखील अफगाणिस्तानातील हिंसाचारावर व तालिबानच्या हल्ल्यांमुळे विस्थापित होणार्यांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. अफगाणिस्तान गृहयुद्धाच्या दिशेने पुढे चालल्याचा इशारा अमेरिकी नेते व विश्लेषक देत आहेत.
दरम्यान, तालिबानच्या हल्ल्यांमुळे मध्य आशियातील ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या रशियाच्या मित्रदेशांची सुरक्षा धोक्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांचे अफगाणिस्तान विषयक विशेषदूत झमिर काबुलोव्ह यांनी दिला. काही दिवसांपूर्वी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आवश्यकता भासल्यास अफगाणिस्तानात सैन्य रवाना करण्याचे संकेत दिले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |