कोरोना व वुहान लॅब यांचा संबंध नाकारणे घाईचे ठरेल – ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस

जीनिव्हा – कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला नाही म्हणणे सध्या घाईचे ठरेल, असा दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चीनने अधिक पारदर्शकता व खुलेपणा पाळून साथीच्या सुरुवातीच्या काळातील ‘रॉ डेटा’ संघटनेकडे द्यावा, अशी आग्रही मागणीही केली. ‘डब्ल्यूएचओ’ व घेब्रेस्यूस यांनी सुरुवातीच्या काळात ‘वुहान लॅब थिअरी’ पूर्णपणे फेटाळून लावली होती. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते.

मात्र चीनकडून सुरू असणार्‍या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेरिका व युरोपसह जगातील अनेक देशांनी वुहान लॅब लीक थिअरी उचलून धरण्यास सुरुवात केली असून त्यासंदर्भातील विविध प्रकारची माहितीही समोर येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसातच अमेरिकी प्रयोगशाळा तसेच युरोपियन संशोधकांचे अहवाल प्रसिद्ध झाले असून, त्यात कोरोनाव्हायरस वुहान लॅबमध्ये तयार झाल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारी माहिती आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी घेतलेला ‘यु टर्न’ महत्त्वाचा ठरतो. ‘डब्ल्यूएचओ’ने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. त्यावेळी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीही त्याचे समर्थन केले होते. या अहवालापूर्वीही त्यांनी सातत्याने चीनची बाजू घेतल्याचे समोर आले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रचंड दडपण येत असल्याने ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांना ‘वुहान लॅब लीक थिअरी’चे समर्थन करून चीनकडे माहितीसंदर्भात मागणी करावी लागत असल्याचे दिसत आहे. ही बाब चीनला अधिक अडचणीत आणणारी ठरु शकते.

चीनने कोरोनाच्या उगमाची चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी – जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांची मागणी

बर्लिन – कोरोना साथीचा उगम नक्की कुठून झाला याची अधिक चौकशी करण्यासाठी चीनने परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पॅह्न यांनी केली आहे. कोरोनाव्हायरसचा शोध घेण्यासाठी अधिक माहिती आवश्यक असल्याने चीनने सहकार्य करावे, असेही जर्मन आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. जर्मनीची ही मागणी कोरोना साथीच्या प्रकरणात चीनवरील आंतरराष्ट्रीय दडपण अधिक वाढू लागल्याचे संकेत देत आहे.

दरम्यान, जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी, चीनची राजवट कोरोनाच्या लसी पुरविताना उघडपणे राजकीय मागण्य करीत असल्याचा आरोप केला आहे. मास यांनी चीनबरोबरच रशियाकडूनही असे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात जगातील अनेक देशांनी चीनच्या लसी नाकारण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, जर्मनीने केलेला आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info