चीन तैवानच्या मुद्यावर तडजोड करणार नाही

- तैवानला सुरक्षेची हमी देणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना चीनचा इशारा

वॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – तैवानच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे चीनने बजावले आहे. चीनने तैवानवर हल्ला चढविला तर अमेरिका तैवानचे संरक्षण करील, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले होते. त्यावर चीनकडून ही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, राष्ट्राध्यक्षांनी धोरण बदलत असल्याचे कुठेही सांगितलेले नाही, असे नमूद करण्यात आले. तैवानने बायडेन यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.

तडजोड

‘तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. तैवान चीनचा अंतर्गत मुद्दा असून त्यात परकीय हस्तक्षेपाला थारा नाही. चीनचे सार्वभौमत्त्व व प्रादेशिक एकजूट या मुद्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही अथवा सूटही देण्यात येणार नाही’, असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचे विलिनीकरण होणारच, असे आक्रमक वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.

गुरुवारी ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या टाऊन हॉल कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना, तैवानवरील चीनच्या हल्ल्याबाबत प्रश्‍न करण्यात आला. चीनने हल्ला केला तर अमेरिका तैवानचे संरक्षण करणार का असे बायडेन यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना, हो अमेरिका त्यासाठी वचनबद्ध आहे, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितले. बायडेन यांनी कार्यक्रमादरम्यान दोनदा असे सांगितल्याची माहिती ‘सीएनएन’च्या वृत्तात देण्यात आली आहे.

तडजोड

अमेरिकेचे तैवान धोरण ‘स्ट्रॅटेजिक ऍम्बिग्विटी’ अर्थात संदिग्धता बाळगणारे म्हणून ओळखले जाते. मात्र बायडेन यांनी केलेले वक्तव्य धोरणत्मक स्पष्टता अर्थात ‘क्लॅरिटी’चे संकेत देणारे असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकेने चीनच्या ‘वन चायना प्रिन्सिपल’ला मान्यता दिली असून त्यात, तैवान हा चीनचा भाग असल्याचा दावा मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील काळात अमेरिकी प्रशासनाने जर हे धोरण स्वीकारले तर तो चीनसाठी मोठा धक्का ठरु शकतो, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र असे घडण्याची शक्यता कमी असल्याचे व्हाईट हाऊसच्या निवेदनानंतर स्पष्ट झाले.

तडजोड

बायडेन यांच्या वक्तव्यावर खुलासा करताना, व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी तैवानसंदर्भातील धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे नमूद केले. अमेरिकेचे तैवानबरोबरील संबंध ‘तैवान रिलेशन्स ऍक्ट’नुसार असून, त्यात अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेसाठी आवश्यक सहाय्य पुरविण्याचे मान्य केले आहे, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्याचवेळी तैवान मुद्यावरील ‘जैसे थे स्थिती’ बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना अमेरिकेचा विरोध कायम राहिल, असेही व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.

तैवानने अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. बायडेन यांचे आभार मानतानाच तैवान सरकार स्वसंरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, ब्रिटनने तैवानबाबत चीनकडून करण्यात येणार्‍या हालचाली धोकादायक असून त्याचे रुपांतर युद्धात होऊ शकते, असा इशारा दिला आहे. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी नाटोच्या बैठकीत याबाबत वक्तव्य केले. ‘चीनकडून तैवानच्या हवाईहद्दीत सुरू असणारी घुसखोरी अतिशय धोकादायक आहे. पाश्‍चात्य देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले असतानाच, चीनने आता या क्षेत्रात लष्करी सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरेल. चीनच्या कारवायांमुळे या क्षेत्रासह नजिकच्या वादग्रस्त भागांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो’, असे वॉलेस यांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info

&nbsp