पॅरिस – दक्षिण पॅसिफिक सागरी क्षेत्रात मासेमारीच्या नावाखाली लुटमार करणार्या चीनला उत्तर देण्यासाठी दक्षिण पॅसिफिक देशांच्या तटरक्षकदलांचे नेटवर्क उभारणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केली. थेट उल्लेख टाळला असला तरी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ही घोषणा चीनच्या आक्रमक सागरी हालचालींविरोधात असल्याचा दावा केला जातो. याआधीच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी फ्रान्सने भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर लष्करी सहाय्य वाढविण्याला प्राधान्य दिले आहे.
फ्रान्सची हिंदी महासागर क्षेत्रात रियुनियन आयलँड तर पॅसिफिक महासागरातील फ्रेंच पॉलिनेशिया, न्यू कॅलेडोनिया ही बेट प्रदेश आहेत. या बेटांच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांपासून ‘फ्रान्स-ओशियनिया’ बैठकीचे आयोजन केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह ऑस्ट्रेलिया, मार्शल आयलँड, पापुआ न्यू-गिनीचे राष्ट्रप्रमुख तर न्यूझीलंड व इतर पॅसिफिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दक्षिण पॅसिफिक सागरी क्षेत्रातील आक्रमकतेचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी यावेळी मांडला.