सलग तिसऱ्या दिवशी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले

- डोनेत्स्कमधील प्रतिहल्ल्यात 400 रशियन जवान मारले गेल्याचा युक्रेनचा दावा

सलग तिसऱ्या दिवशी

मॉस्को/किव्ह – रशियाने सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनची राजधानी किव्ह व इतर शहरांना लक्ष्य केले. रविवारी रात्रीपासून सुरू केलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाने 40 ड्रोन्सचा वापर केल्याची माहिती युक्रेनने दिली. या हल्ल्यात किव्ह व इतर शहरांमधील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागांमध्ये पुन्हा ‘ब्लॅकआऊट’ लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, रशियावर प्रतिहल्ले चढविणाऱ्या युक्रेनी फौजांनी डोनेत्स्क प्रांतात जबरदस्त रॉकट हल्ला केला. माकिव्हका शहरातील या हल्ल्यात रशियाचे 400 जवान ठार झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

सलग तिसऱ्या दिवशी

डिसेंबर महिन्यात पुतिन यांनी बेलारुसला भेट देऊन रशियाच्या लष्करी तैनातीची पाहणी केली होती. रशियाच्या गुप्तचर यंत्रणा, संरक्षणदले, शस्त्रास्त्रनिर्मिती कंपन्या यांच्याबरोबर एकापाठोपाठ एक बैठका घेतल्या होत्या. पुतिन यांनी रशियाच्या लष्करी तुकडीलाही भेट दिली होती. त्यानंतर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जनतेला संबोधित केले होते. त्यात मातृभूमीच्या संरक्षणासाठी रशियन फौजा लढत असल्याचे सांगून पुढील काळात संघर्ष सुरू ठेवण्याचे संकेतही दिले होते. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या बैठका व इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशिया नव्या आक्रमणाची तयारी करीत असल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी केले होते.

सलग तिसऱ्या दिवशी

गेले तीन दिवस सलग होणारे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले रशियाने युक्रेनमधील मोहिम अधिक व्यापक व प्रखर केल्याचे संकेत देत आहेत. सोमवारी रशियन फौजांनी राजधानी किव्ह व जवळच्या भागांवर ड्रोन्सचा मारा केला. यासाठी इराणी बनावटीच्या शाहेद या आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. हल्ल्यासाठी एकूण 40 ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. हल्ल्यादरम्यान किव्हमधील वीजपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून अनेक भागांमध्ये ब्लॅकआऊट लागू झाला आहे. पाश्चिमात्यांच्या सहाय्याने वीजपुरवठा व संबंधित यंत्रणा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांना नव्या हल्ल्यांमुळे धक्का बसल्याचा दावा करण्यात येतो.

सलग तिसऱ्या दिवशी

रशिया हल्ल्यांची तीव्रता वाढवित असतानाच युक्रेननेही जोरदार प्रतिहल्ले सुरू केले आहेत. डोनेत्स्क प्रांतातील माकिव्हका भागात युक्रेनी लष्कराने रॉकेट्सचा मारा केला. या माऱ्यात रशियन लष्कराच्या एका इमारतीला लक्ष्य करण्यात आले असून त्यात तब्बल 400 जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र रशियन संरक्षण मंत्रालयाने सदर दावा फेटाळला. माकिव्हकावर सहा ‘हायमार्स’ रॉकेटस्‌‍चा मारा करण्यात आला व त्यात 63 रशियन जवानांचा मृत्यू झाला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. रविवारी मध्यरात्रीनंतर हा हल्ला झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. युक्रेनने गेल्या महिन्याभरात डोनेत्स्क प्रांतात चढविलेला हा दुसरा मोठा हल्ला ठरला आहे. डिसेंबर महिन्यात युक्रेनने डोनेत्स्क शहरावर मोठे रॉकेट हल्ले चढविले होते.

दरम्यान, दक्षिण रशियातील वोरोनेझ शहरात युक्रेनकडून होणारा ड्रोनहल्ला उधळल्याची माहिती रशियाने दिली आहे. रविवारी रात्री रशियाच्या हवाईसुरक्षा यंत्रणांनी युक्रेनी ड्रोन पाडल्याचे रशियन यंत्रणांकडून सांगण्यात आले.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info