क्युबातील निदर्शनांनंतर अमेरिकेची भूमिका लष्करी आक्रमणाचे संकेत देणारी

क्युबाचा आरोप

हवाना/वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात क्युबात झालेल्या निदर्शनांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व प्रशासनाकडून करण्यात येणारी वक्तव्ये लष्करी आक्रमणाचे संकेत देणारी आहेत, असा आरोप क्युबाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला. काही दिवसांपूर्वीच क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांनी, क्युबा अस्थिर व धोकादायक बनला आहे अशा प्रकारचे चित्र उभे करण्यामागे आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा केला होता. गेल्या आठवड्यात क्युबात सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या कारभाराविरोधात व्यापक निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी राजवटीविरोधात झालेली ही सर्वात मोठी निदर्शने असल्याचे सांगण्यात येते.

आक्रमणाचे संकेत

क्युबात झालेल्या व्यापक निदर्शनांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी समर्थन दिले होते. ही निदर्शने म्हणजे क्युबन जनतेचा आक्रोश असून तो दडपण्याऐवजी सत्ताधारी राजवटीने लोकांचा आवाज ऐकायला हवा, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली होती. अमेरिकेतील अनेक संसद सदस्यांनी क्युबातील राजवटविरोधी निदर्शनांना पाठिंबा देऊन, हस्तक्षेपाची मागणी केली होती. क्युबन अमेरिकी नागरिकांच्या गटांनी, बायडेन प्रशासनाने हस्तक्षेप केला नाही तर क्युबात रक्ताचे पाट वाहतील, असा गंभीर इशारा दिला होता. मात्र रशिया व लॅटिन अमेरिकेतील काही देशांनी क्युबात परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे बजावले होते.

या पार्श्‍वभूमीवर क्युबा सरकारने अमेरिकेवर नवे टीकास्त्र सोडले आहे. क्युबाच्या परराष्ट्र विभागातील ‘युएस अफेअर्स’ विभागाच्या वरिष्ठ अधिकारी जोहाना तब्लादा यांनी, अमेरिकी प्रशासन क्युबातील परिस्थितीचे चुकीचे चित्र उभे करीत असल्याचा आरोप केला. ‘हॉलिवूडमधील वॉल्ट डिस्नेने वाईट राजवट व स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या जनतेचे कथानक उभे केले आहे. क्युबात कधीही पाऊल न ठेवलेल्यांना या कथानकातील विशिष्ट प्रतिमेची पात्रे बघून भीती वाटणारच आहे. याचे कारण कथानक सत्याचा विपर्यास करून व घमेंडी स्वभावातून तयार झाले आहे’, असा उपरोधिक टोला तब्लादा यांनी लगावला.

आक्रमणाचे संकेत

‘सध्या अमेरिकेकडून क्युबाविरोधातील लष्करी मोहिमेसाठी कोणत्याही हालचाली सुरू झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र अमेरिकी प्रशासनाकडून टोकाची आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे व ही भूमिका लष्करी आक्रमणाचे संकेत देणारी आहे. यापूर्वी लिबिया व इराकमधील लष्करी हस्तक्षेपापूर्वीही अशाच प्रकारची भूमिका घेण्यात आली होती. 11 जुलैच्या निदर्शनांनंतर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने क्युबासंदर्भात चुकीची वक्तव्ये करीत आहेत’, असा आरोप जोहाना तब्लादा यांनी केला.

बायडेन प्रशासनाने क्युबाच्या राजवटीवर यापूर्वी लादण्यात आलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. त्याचवेळी क्युबन जनतेला इंटरनेट उपलब्ध व्हावे म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेतील क्युबन समुदायाकडून क्युबात पाठविण्यात येणार्‍या पैशांसंदर्भातील नियम शिथिल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे क्युबाविषयक धोरण कमकुवत असल्याचा ठपका ठेवला असून डेमोक्रॅट पक्षातील नेतेच क्युबतील कम्युनिस्ट राजवटीचे समर्थन करीत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

1959 साली क्युबात झालेल्या क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वाखाली कम्युनिस्ट राजवट सत्तेवर आली होती. अमेरिकेने अनेकदा कॅस्ट्रो यांची राजवट उलथण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले होते. अमेरिकेने क्युबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंधही लादले होते. 2015 साली तत्कालिन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबावरील निर्बंध काही प्रमाणात उठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत क्युबाचा समावेश दहशतवादी समर्थक देशांच्या यादीत करून नवे निर्बंध लादण्यात आले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info