वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार असली आर्थिक विकास असंतुलित राहण्याची भीती असून, गरीबी, असंतोष तसेच भूराजकीय तणावांमध्ये अधिकच भर पडेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. 2021 सालच्या अखेरीस अर्थव्यवस्थेत वाढ दिसून आली तरी पुढील वर्षी अर्थव्यवस्था पुन्हा मंदावेल, असेही नाणेनिधीच्या अहवालात बजावण्यात आले आहे.
नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी मंगळवारी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट’ प्रसिद्ध केला. या अहवालाचे शीर्षकच ‘फॉल्ट लाईन्स वायडन इन द ग्लोबल रिकव्हरी’ असे आहे. नाणेनिधीने एप्रिल महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर जागतिक स्तरावरील परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. लसींची उपलब्धता हा एक प्रमुख घटक म्हणून उदयास आला असून जागतिक अर्थव्यवस्थेला दुभंग करणारी रेषा ठरल्याकडे अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी लक्ष वेधले.