लंडन – चीन व रशियाच्या अंतराळातील कारवाया हा अंतराळक्षेत्रासाठी वाढता धोका ठरत असल्याचा इशारा ब्रिटीश संरक्षणदलांच्या अधिकार्यांनी दिला. गुरुवारी ब्रिटनचे ‘स्पेस कमांड’ पूर्णपणे कार्यरत झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात संरक्षणदलांच्या अधिकार्यांनी चीन व रशियाच्या धोक्याकडे लक्ष वेधले. यावेळी ब्रिटन भविष्यात ‘स्पेस वेपन्स’ तैनात करून त्यांचा वापर करु शकतो, असे संकेतही देण्यात आले. गेल्याच महिन्यात चीन व रशियाकडून महत्त्वाकांक्षी ‘मून बेस’ची घोषणा करण्यात आली होती.
‘चीनकडून उपग्रह भेदणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. यात उपग्रहांना थेट उडविणारी क्षेपणास्त्रे, लेझर वेपन्स, इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि थेट उपग्रहांना धडक देणारी यंत्रणा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. चीनने त्यांच्या निकामी व जुन्या उपग्रहांना लक्ष्य करून या सर्वांच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि क्षमता सिद्ध केली आहे’, या शब्दात एअरचीफ मार्शल सर माईक विग्स्टन यांनी चीनच्या धोक्याबाबत बजावले. गेल्या वर्षभरात रशियाने अंतराळात शस्त्रांसारखा वापर करता येईल, अशा प्रकारचे उपग्रह तैनात केले होते, याकडेही सर विग्स्टन यांनी लक्ष वेधले. दुसरा उपग्रह उडविता येईल, अशा रितीने रशियाने या उपग्रहाच्या हालचाली केल्या होत्या, असा दावाही ब्रिटीश अधिकार्यांनी केला.