अफगाणी लष्कराची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तालिबानच्या ४५५ दहशतवाद्यांना ठार केले

काबुल – अफगाणिस्तानातील संघर्षाचे पारडे फिरू लागले असून अफगाणिस्तानच्या लष्कराने केलेल्या कारवाईत ठार झालेल्या तालिबानी दहशतवाद्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. २४ तासात अफगाणी लष्कराने पंधरा प्रांतांमध्ये चढविलेल्या हल्ल्यात तब्बल ४५५ तालिबानी ठार झाले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दूतावासाने तालिबानवर सूडापोटी हत्याकांड घडविल्याचा आरोप केला आहे. स्पिन बोल्दाकमध्ये अफगाण सरकार व पाश्‍चिमात्य लष्कराचे समर्थन करणार्‍यांना ठार करून तालिबान सूड उगावत असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे.

४५५

तालिबानचे दहशतवादी कंदहार, हेल्मंड आणि हेरात प्रांताची राजधानी ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या आघाडीवर तालिबानला यश मिळत असल्याचा दावा काही वृत्तसंस्था करीत आहेत. तर अफगाणिस्तानच्या लष्कराने देखील तालिबानवरील आपली कारवाई तीव्र केल्याचे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तालिबानच्या ठिकाणांवर रॉकेट्सचा वर्षाव करीत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करून तालिबानची गय करणार नसल्याचे स्पष्ट केले.

सोमवारी सकाळी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात तालिबानचे ४५५ दहशतवादी ठार, तर २३२ जखमी झाले. तालिबानने हेल्मंड प्रांताची राजधानी लश्करगह येथील कारागृहावर हल्ला चढवून आपल्या साथीदारांची सुटका करण्याचा अपयशी प्रयत्न केला. यावेळी अफगाणी लष्कराच्या कारवाईत ३८ तालिबानी जागीच ठार झाले. अफगाणी लष्कराला स्थानिकांचा साथ मिळत असल्यामुळे तालिबानचे हल्ले मोडून काढण्यात यश मिळत असल्याचा दावा केला जातो.

४५५

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानच्या या वाढत्या हल्ल्यांवर टीका केली. अफगाणिस्तानच्या जनतेने २० वर्षांपूर्वी जी तालिबान पाहिली होती, त्याहून आत्ताची तालिबान अधिक क्रूर असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिला. गेल्या दोन दशकात तालिबान पूर्णपणे बदलली असून दहशतवादी अधिक निर्दयी, अमानुष बनल्याचे राष्ट्राध्यक्ष गनी म्हणाले. ‘सध्या सुरू असलेल्या संघर्षात पूर्णपणे पराभूत झाल्याशिवाय तालिबानमध्ये बदल होणे शक्य नाही व यासाठी अफगाणी जनतेला एकजूट करून तालिबानला पराभूत करावे लागेल’, असे आवाहन अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी केले.

४५५

त्याचबरोबर अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीला अमेरिकेची अनपेक्षित माघार जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष गनी यांनी ठेवला. ‘या आकस्मिक माघारीचा अफगाणिस्तानच्या सुरक्षेवर परिणाम होईल, याची जाणीव अमेरिकेला करुन दिली होती. तरीही अमेरिकेने माघार घेतली’, अशी टीका गनी यांनी केली. तरीही अमेरिकेने आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले असून पुढील सहा महिन्यात परिस्थिती बदलेल, असा विश्‍वास गनी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राजधानी काबुलमधल अमेरिकेच्या दूतावासाने तालिबानला अफगाणिस्तानातील हत्याकांडासाठी जबाबदार धरले आहे. सूडाने पेटलेल्या तालिबानने कंदहारच्या स्पिन बोल्दाकमध्ये अफगाणी नागरिकांचे हत्याकांड घडविल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. तालिबानचे नेतृत्व या हत्याकांडासाठी जबाबदार असून त्यांच्यावर युद्धगुन्हे दाखल केले जावे, अशी मागणी अमेरिकी दूतावासाने केली. तसेच तालिबानचे नेतृत्व आपल्या सहकार्‍यांना रोखू शकणार नसेल, तर तुम्ही प्रशासन चालवू शकत नाही, असा इशारा अफगाणी दूतावासाने सोशल मीडियावरुन दिला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info