युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे झॅपोरिझिआसह दक्षिण युक्रेनमध्ये हल्ले

- अमेरिकेकडून नव्या हल्ल्यांबाबत इशारा

झॅपोरिझिआसह

मॉस्को/किव्ह – युक्रेन बुधवारी स्वातंत्र्यदिन साजरा करीत असून या पार्श्वभूमीवर रशियाने जबरदस्त हल्ले सुरू केले आहेत. सोमवारी तसेच मंगळवारी पहाटे रशियाने झॅपोरिझिआसह खेर्सन, मायकोलेव्ह, ओडेसा तसेच डिनिप्रोपेोव्हस्क प्रांतात जोरदार हल्ले केले. यात युक्रेनचे लष्करी तळ, रसदीचे मार्ग, वीजनिर्मिती केंद्र तसेच शस्त्रसाठा लक्ष्य करण्यात आला. तर अमेरिकेने येत्या काही दिवसात रशिया मोठे व अधिक आक्रमक स्वरुपाचे हल्ले करेल, असा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसात युक्रेनच्या फौजांनी रशियाच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये प्रतिहल्ले चढविले होते. पाश्चिमात्य देशांकडून मिळणाऱ्या वाढत्या सहाय्याच्या जोरावर युक्रेनने रशियाविरोधातील मोहीम तीव्र केली होती. याअंतर्गत रशियाच्या ताब्यातील क्रिमिआ प्रांतातही हल्ले करण्यात आले. खेर्सन प्रांतातील काही भाग युक्रेनने परत घेतल्याचे दावेही करण्यात आले होते. याच कालावधीत डोन्बास क्षेत्रातही रशियाला आगेकूच करण्यात अपयश आले होते. एकापाठोपाठ बसलेल्या धक्क्यांमुळे रशियन वर्तुळात खळबळ उडाली होती.

झॅपोरिझिआसह

मात्र गेल्या दोन-तीन दिवसात रशियाने हे चित्र पुन्हा बदलण्यास सुरुवात केल्याचे दिसते. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हपासून ते दक्षिण युक्रेनमधील ओडेसापर्यंत हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती वाढविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने दक्षिण युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र, रॉकेट तसेच तोफांचा मारा सुरू आहे. क्षेपणास्त्रहल्ल्यांसाठी रशियाने ‘एसयु-३५’ या लढाऊ विमानांसह ‘केएच-५९’ क्षेपणास्त्रे तसेच ‘एस-३००’ यंत्रणेचा वापर केल्याचे सांगण्यात येते. युक्रेनच्या यंत्रणांनीही, रशियाच्या वाढत्या हल्ल्यांची कबुली दिली असून रशियन फौजांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे म्हटले आहे.

झॅपोरिझिआसह

रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांमागे बुधवार २४ ऑगस्टला असलेला युक्रेनचा स्वातंत्र्यदिन हे एक कारण असल्याचे सांगण्यात येते. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर रशिया मोठे व तीव्र स्वरुपाचे हल्ले करेल, असा इशारा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीच दिला आहे. त्याला अमेरिकेनेही दुजोरा दिला असून युक्रेनमधील आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला. त्यात रशियन हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगण्याचे तसेच शक्य झाल्यास माघारी येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, युरोपिय महासंघातील प्रमुख देश व युक्रेनचा शेजारी देश असणाऱ्या पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज डुडा यांनी मंगळवारी युक्रेनला भेट दिली. यावेळी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी लष्करी सहकार्यासह आर्थिक व मानवतावादी सहाय्याबाबत बोलणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलंड हा युक्रेनचे आक्रमक समर्थन करणारा देश म्हणून पुढे आला असून नाटो व युरोपने रशियाविरोधात आघाडी उभी करावी, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info