स्वीडन व फिनलँड नाटोत सामील झाले तर रशिया बाल्टिक क्षेत्रात नवी अण्वस्त्रे तैनात करील

- रशियाचा इशारा

स्वीडन व फिनलँड

मॉस्को/वॉशिंग्टन/किव्ह – स्वीडन व फिनलँड हे देश नाटोत सामील झाले तर रशिया बाल्टिक क्षेत्रात अतिरिक्त अण्वस्त्रे तैनात करील, असा इशारा रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. बाल्टिकमधील आण्विक तैनातीबरोबरच रशिया फिनलँडच्या आखातातील संरक्षणतैनातीदेखील वाढविल, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले. स्वीडन व फिनलँडच्या नेत्यांची नुकतीच बैठक झाली. यात दोन्ही देशांनी नाटो सदस्यत्वाच्या प्रस्तावाला वेग देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह नाटो सदस्य देश रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत. नाटोच्या सदस्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरवितानाच पूर्व युरोपातील रशियाविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. फिनलँड व स्वीडनमध्ये नाटोच्या सदस्यत्वासाठी हालचाली सुरू होणे त्याचाच भाग मानला जातो. फिनलँड आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आत्तापर्यंत नाटोत सामील होण्याचे टाळले होते. दोन्ही देशांच्या जनतेने देखील नाटोतील सहभागाला विरोध केला होता. पण युक्रेनच्या युद्धामुळे या दोन्ही देशांमधील जनमत बदलू लागल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे.

स्वीडन व फिनलँड

रशियाने यापूर्वीही नाटोच्या विस्ताराला सातत्याने विरोध दर्शविला आहे. युक्रेनवरील लष्करी कारवाईमागेही युक्रेनकडून नाटोच्या सदस्यत्वासाठी चाललेले प्रयत्न हे प्रमुख कारण ठरले होते. नाटोच्या विस्तारामुळे युरोप अस्थिर होईल व रशियाला आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावी लागतील, असा सज्जड इशारा रशियाने यापूर्वी दिला होता. मात्र आता फिनलँड व स्वीडनच्या नेत्यांमध्ये झालेली बैठक आणि त्यांनी नाटोच्या सदस्यत्वाबाबत दिलेले संकेत यामुळे रशिया अधिकच आक्रमक बनल्याचे दिसते.

मेदवेदेव्ह यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. ‘बाल्टिक क्षेत्र अण्वस्त्रमुक्त ठेवण्याबाबत यापुढे चर्चा होणार नाही. या क्षेत्राचा समतोल साधण्यासाठी रशिया आवश्यक पावले उचलेल. आमचे हात बांधलेले नाहीत. रशिया आवश्यक ती सर्व तैनाती करील’, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले. बाल्टिक क्षेत्रात रशियाचा ‘कॅलिनिनग्रॅड’ हा संरक्षणतळ आहे. पोलंड व लिथुआनियामध्ये असणार्‍या या तळावर रशियाने यापूर्वीही इस्कंदरसह इतर आण्विक तैनाती केल्याचे समोर आले होते. मात्र स्वीडन व फिनलँडच्या नाटोतील समावेशानंतर रशिया आण्विक तैनाती अधिक वाढवेल, असे संकेत मेदवेदेव्ह यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

स्वीडन व फिनलँड

दरम्यान, अमेरिकेने युक्रेनला नव्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत युक्रेनला ८० कोटी डॉलर्सची शस्त्रे पुरविण्यात येणार आहेत. त्यात रडार, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, रणगाडे, सशस्त्र वाहने व क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला १.७ अब्ज डॉलर्सचा शस्त्रसाठा पुरविला आहे.

रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’चे नेतृत्त्व करणार्‍या ‘मोस्कव्हा’ या ‘मिसाईल क्रूझर शिप’वर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण विभागाने केला. ओडेसाजवळ तैनात असणार्‍या नेपच्यून क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा हल्ला चढविण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाची ही युद्धनौका बुडण्याच्या बेतात असल्याचेही युक्रेनने म्हटले आहे. रशियाने युद्धनौकेचे नुकसान झाल्याचे मान्य केले असले तरी हल्ला व इतर हानीसंदर्भातील युक्रेनचे दावे फेटाळले आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info