अफगाणी संरक्षणमंत्र्यांच्या घरावर तालिबानचा हल्ला – अफगाण सरकारवरील हल्ले वाढविण्याची तालिबानची धमकी

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुलमध्ये अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे घर बॉम्बस्फोटात उडवून देऊन आठ जणांचा बळी घेतला. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ‘अफगाणी लष्कराने सुरू केलेल्या कारवाईचा सूड घेण्यासाठी हा हल्ला चढविण्यात आला. येत्या काळातही अफगाणी सरकार व घुसखोरांवरील असे हल्ले सुरू राहतील’, अशी धमकी मुजाहिदने दिली. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तालिबानच्या या हल्ल्याचा निषेध केला. तसेच अफगाणिस्तानात हिंसाचार घडविणार्‍या तालिबानच्या राजवटीला मान्यता दिली जाणार नाही, असे सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले.

अफगाणिस्तानचे हंगामी संरक्षणमंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ मंगळवारी रात्री मोठा स्फोट झाला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी मोहम्मदी यांच्या घराजवळ आदळली. या स्फोटातून संरक्षणमंत्री बचावले, पण त्यांचे सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर किमान पाच तास अफगाणी लष्कर आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू होता. तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद याने सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

अफगाणी संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक सुरू असताना हा स्फोट घडविल्याचे मुजाहिदने मान्य केले. गनी सरकारवरील हा शेवटचा हल्ला नाही. पुढच्या काळात सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना व सहकार्‍यांना लक्ष्य करणार असल्याचे मुजाहिदने धमकावले. त्याचबरोबर अफगाण सरकारला समर्थन देणार्‍या पाश्‍चिमात्य देशांचे हितसंबंध देखील आपल्या हल्ल्यापासून सुरक्षित नसल्याचा इशारा झबिहुल्ला मुजाहिदने दिला.

अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानला मोठी जीवितहानी सोसावी लागत असल्याचे मुजाहिदच्या धमकीतून स्पष्ट होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये अफगाणी लष्कराने तालिबानवरील हल्ले तीव्र केले आहेत. गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानचे 274 दहशतवादी ठार झाले. यामध्ये कंदहार, हेल्मंड, जोवझान प्रांतातील हवाई कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

अफगाण लष्कराने तालिबानविरोधात सुरू केलेल्या या कारवाईला स्थानिकांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे. गेली तीन रात्र राजधानी काबुल, हेल्मंडची राजधानी लश्करगह तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये जनता रस्त्यावर उतरून तालिबानविरोधात घोषणा देत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये गनी सरकारमधील नेते देखील सहभागी झाले आहेत. तर काही ठिकाणी तालिबानविरोधी संघर्षासाठी महिलांनी रायफल्स हाती घेतल्याच्या बातम्या आहेत.

आपल्या देशातील या दहशतवादी हल्ल्यांसाठी व अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद व लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तालिबानच्या साथीने अफगाणी शहरांवर हल्ले चढवित असल्याचा ठपका अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने केला. तर 170 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नूरीस्तान प्रांतातील अफगाण लष्कराच्या तळाचा ताबा घेतल्याचा दावा फ्रेंच विश्‍लेषक फॅबियन बुसार्ट यांनी केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info