लेबेनॉनमधून हिजबुल्लाहचा इस्रायलवर रॉकेट्चा मारा

रॉकेट्चा मारा

तेल अविव – लेबेनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर १९ रॉकेट्सचा मारा केला. काही तासांपूर्वी इस्रायलने लेबेनॉनमध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्याचा सूड घेण्यासाठी हे हल्ले चढविल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने आपल्या सुरक्षा यंत्रणांची तातडीची बैठक घेतली आहे. हिजबुल्लाहने लेबेनॉनच्या भूमीचा वापर करून आपल्यावर हल्ले चढविले, तर त्यासाठी लेबेनॉनला जबाबदार धरले जाईल, असे इस्रायलने याआधीच बजावले होते. त्यामुळे लवकरच इस्रायल जबरदस्त कारवाई करून या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दोन दिवसांपूर्वी लेबेनॉनच्या दक्षिण सीमेतून इस्रायलवर तीन रॉकेट डागण्यात आले होते. लेबेनॉनमधील पॅलेस्टाईन समर्थक दहशतवादी गटाने हे हल्ले चढविल्याचा दावा करून इस्रायलने हिजबुल्लाहवर आरोप करण्याचे टाळले होते. त्याचबरोबर प्रत्युत्तरादाखल रॉकेट प्रक्षेपित केलेल्या लेबेनॉनमधील गावांवर इस्रायलने हवाई हल्ले चढविले होते. दोन्हीकडच्या या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नव्हती. या प्रकरणाला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी लेबेनॉनच्या सीमेजवळून इस्रायलवर १९ रॉकेट्स डागले. लघुपल्ल्याच्या रॉकेट्सचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलने सीमेवर तैनात केलेल्या आयर्न डोम या हवाई सुरक्षा यंत्रणेने १० रॉकेट्स यशस्वीरित्या भेदले. तर सहा रॉकेट्स इस्रायलच्या हार दोव भागात कोसळले. उर्वरित तीन रॉकेट्स लेबेनॉनची सीमा ओलांडू शकले नाहीत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/hezbollah-fires-rockets-at-israel-from-lebanon/