युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी अमेरिकी संसदेची दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरलेल्या कायद्याला मंजुरी

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून युक्रेनसाठी ३३ अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव

वॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह इतर रशियन नेते युक्रेनमधील परकीय हस्तक्षेपावरून इशारे देत असतानाच अमेरिकेने युक्रेनचा शस्त्रपुरवठा अधिकच वाढविण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत युक्रेनला वेगाने शस्त्रपुरवठा व्हावा यासाठी विशेष कायदा मंजूर करण्यात आला. ‘लेंड लीझ ॲक्ट’ असे नाव असलेल्या या कायद्याचा वापर यापूर्वी दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला होता. हा कायदा मंजूर होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला अविरत शस्त्रपुरवठा करण्यासाठी ३३ अब्ज डॉलर्सचा नवा प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकेच्या या हालचालींमुळे रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत लांबण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे.

शस्त्रपुरवठा

गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत, ‘युक्रेन डेमोक्रसी डिफेन्स लेंड-लीझ ॲक्ट ऑफ २०२२’ या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सिनेटमध्ये एकमुखाने मान्यता दिलेल्या या विधेयकाला प्रतिनिधीगृहाने ४१७ विरुद्ध १० मतांनी मंजुरी दिली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या स्वाक्षरीनंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. ‘लेंड लीझ ॲक्ट’ हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कायदा असून १९४० साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या कायद्याच्या आधारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने ब्रिटन व मित्रदेशांना प्रचंड प्रमाणात शस्त्रपुरवठा केला होता.

युक्रेन हुकुमशाहीविरोधात लढत आहे, या देशाने अविश्वसनीय धैर्य व पराक्रम दाखविला आहे. अमेरिकेने या देशाला मोठ्या प्रमाणात लष्करी व इतर सहाय्य पुरविण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात अमेरिकी संसद सदस्यांनी युक्रेनसाठीच्या कायद्याचे समर्थन केले. नव्या कायद्यामुळे युक्रेनसह युरोपातील इतर देशांनाही शस्त्रपुरवठा करणे सुलभ होणार असून त्यात इतर नियमांचा अडथळा येणार नाही, असे सांगण्यात येते. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला जवळपास पाच अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचा शस्त्रपुरवठा केला आहे.

शस्त्रपुरवठा

युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी कायदा मंजूर होत असतानाच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनसाठी तब्बल ३३ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. गेल्याच महिन्यात बायडेन प्रशासनाने युक्रेनसाठी १३.६ डॉलर्सचा प्रस्ताव दिला होता. नव्या प्रस्तावाद्वारे अमेरिकेने युक्रेनला पुढील काही वर्षांसाठी शस्त्रपुरवठा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. ‘रशियाविरोधातील युद्ध कमी पैशात संपणारे नाही. मात्र युक्रेनला रशियन आक्रमणाविरोधात माघार घ्यावी लागली तर त्याची जबर किंमत मोजणे भाग पडेल. युक्रेनची जनता देशाच्या संरक्षणासाठी लढत असताना त्यांना सहाय्य करावेच लागेल. नाहीतर आपल्याला युक्रेनवरील रशियाचे अत्याचार बघावे लागतील’, अशा शब्दात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अतिरिक्त निधीची मागणी केली.

नव्या प्रस्तावातील २० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी थेट शस्त्रास्त्रपुरवठ्यासाठी वापरण्यात येणार आहे. साडेआठ अब्ज युक्रेन सरकारला अर्थसहाय्य म्हणून तर तीन अब्ज डॉलर्स मानवतावादी सहाय्यनिधी म्हणून देण्यात येणार असल्याचे बायडेन प्रशासनाकडून सांगण्यात आले. अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, रायफल्स, हेलिकॉप्टर्स, सशस्त्र वाहने, रडार्स व इतर लष्करी सामुग्रीचा पुरवठा केला आहे.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info