तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे माध्यममंत्री ‘दावा खान’ यांची हत्या

काबुल – अफगाणिस्तान सरकारच्या माध्यम विभागाचे मंत्री व पाकिस्तानचे कडवे विरोधक असलेल्या ‘दावा खान मिनापाल’ यांची तालिबानने काबुलमध्ये हत्या केली. तालिबानने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. दावा खान हे पाकिस्तानचे टीकाकार होते. म्हणूनच त्यांची हत्या घडवून तालिबानने पाकिस्तानचे हितसंबंध जपल्याचा आरोप अफगाणिस्तानात होत आहे. तर पत्रकार, माध्यमप्रमुख, मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष करून तालिबान युद्धगुन्हे करीत असल्याची जळजळीत टीका स्थानिक माध्यमे करीत आहेत.

दावा खान

दोन दिवसांपूर्वी तालिबानने राजधानी काबुलमध्ये संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानावर आत्मघाती हल्ला चढविला होता. या हल्ल्यातून संरक्षणमंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी बचावले होते. पण अफगाणिस्तानच्या लष्कराने सुरू केलेल्या हवाई हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी यापुढेही अफगाणी नेते व अधिकार्‍यांना लक्ष्य करण्याची धमकी तालिबानने दिली होती. शुक्रवारी राजधानी काबुलमध्ये माध्यम विभागाचे मंत्री दावा खान यांची हत्या घडवून तालिबानने आपली धमकी प्रत्यक्षात उतरविली.

तसेच तालिबानने शुक्रवारी निमरोज प्रांताची राजधानी झारांजचा ताबा घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण झारांज शहरात अजूनही लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू असल्याचा दावा अफगाणी सरकार करीत आहे. इराणच्या सीमेजवळ असलेले झारांज शहर व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इराणच्या सीमेवर होणार्‍या व्यापारावर काही अंशी परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जाते. अफगाणी लष्करानेही तालिबानवरील हल्ले सुरू ठेवले आहेत.

गेल्या चोवीस तासात लष्कराने तालिबानच्या ४०६ दहशतवाद्यांना ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. हेल्मंडची राजधानी लश्करगहमध्ये तालिबानवर जोरदार हल्ले सुरू आहेत. येथील कारवाईत तालिबानच्या ‘रेड आर्मी युनिट’चा वरिष्ठ कमांडर मावलावी मुबारक याच्यासह ४० जणांना ठार केल्याचे अफगाणी लष्कराने म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info