खार्किव्हमध्ये युक्रेनला मिळालेले यश म्हणजे युद्धातील ‘टर्निंग पॉईंट’ नाही

- अमेरिकी अधिकाऱ्यांचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनने खार्किव्ह प्रांतातून रशियन सैन्याला माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर ही रशियाच्या पराभवाची सुरुवात ठरेल, असे दावे सुरू झाले आहेत. युक्रेनच्या नेत्यांनी आता क्रिमिआ ताब्यात घेतल्याशिवाय युक्रेनी फौजांची आगेकूच थांबणार नसल्याच्या वल्गनाही केल्या होत्या. मात्र युक्रेनला समर्थन देणाऱ्या अमेरिकी वर्तुळात सावध प्रतिक्रिया उमटत आहेत. खार्किव्हमधील रशियन फौजांची पिछेहाट हा युद्धातील ‘टर्निंग पॉईंट’ मानता येणार नाही, याची जाणीव अमेरिकेच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी करून दिली आहे. लष्करी क्षमतांचा विचार करता अजूनही रशियाकडे जबरदस्त लष्करी ताकद कायम असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी बजावले. बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जॉन किरबाय यांनीही रशियाची संरक्षणसज्जता विसरून चालणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर, रशियाने मध्य युक्रेनमधील ‘क्रिवयि रिह’ शहरावर क्षेपणास्त्रहल्ले चढवून पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे समोर आले.

‘टर्निंग पॉईंट’

गेल्या महिन्यापासून युक्रेनने रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला गेल्या आठवड्यात मोठे यश मिळाल्याचे समोर आले. रशियन फौजांना ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हमधून माघार घेणे भाग पडले होते. त्याचवेळी दक्षिण युक्रेनच्या खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील काही भाग रशियाला गमवावा लागल्याचे समोर आले होते. झॅपोरिझिआमधील मेलिटपोल शहरातून रशियन तुकड्यांची पिछेहाट झाल्याचे वृत्त देण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर युक्रेनसह पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे तसेच अभ्यासगटांनी खार्किव्हमधील माघार रशियाच्या संरक्षणदलांवर घातलेला निर्णायक घाव असल्याचे दावे करण्यास सुरुवात केली होती. काही विश्लेषकांनी हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालावधीतील रशियाचा सर्वात मोठा पराभव असल्याचे म्हटले होते.

‘टर्निंग पॉईंट’

मात्र अमेरिकी अधिकाऱ्यांकडून यावर सावध प्रतिक्रिया उमटत आहेत. खार्किव्हमधील घटनांनंतर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सावधगिरीचा इशारा दिला. ‘रशियन संरक्षणदलांमध्ये अजूनही इतरांचे मोठे नुकसान करण्याची क्षमता आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियन लष्कराची पूर्ण क्षमता अद्याप वापरलेली नाही, हे लक्षात ठेवा’, असे किरबाय यांनी बजावले. त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही खार्किव्हमधील घटनांवरून पुढील घटनांबाबत अंदाज बांधू नका, असे म्हटले आहे. युक्रेनमधील संघर्षासाठी रशियाकडे अजूनही मोठ्या प्रमाणात क्षमता बाकी आहे, याकडे अमेरिकी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

रशियाने बुधवारी मध्य युक्रेनमधील ‘क्रिवयि रिह’ भागात मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये शहरातील मोठ्या धरणासह इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. धरण फुटल्याने शहरातील काही भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले. दरम्यान, रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्तानोव्ह यांनी, अमेरिका हा युक्रेन युद्धात सहभागी असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info