पाच-दहा वर्षात चीन-तैवान युद्धाचा भडका उडून त्यात ऑस्ट्रेलिया खेचला जाईल

तज्ज्ञांचा इशारा

कॅनबेरा/बीजिंग/तैपेई – पुढील पाच ते दहा वर्षात चीन-तैवान युद्धाचा भडका उडणार असून ऑस्ट्रेलिया देखील या युद्धात खेचला जाईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चीनने बाकी कोणतेही डावपेच वापरले तरी तैवान झुकणार नसून, तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनला लष्करी कारवाईच करावी लागेल, असे अमेरिकेच्या स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीच्या विश्‍लेषक व तज्ज्ञ ओरियाना मॅस्ट्रो यांनी बजावले. चीनने हा लष्करी कारवाईचा निर्णय घेतल्यास, अमेरिका या युद्धात नक्की उतरेल व त्यानंतर यात ऑस्ट्रेलियाला सहभागी व्हावेच लागेल, असा निष्कर्ष मॅस्ट्रो यांनी नोंदविलेला आहे.

चीन-तैवान

चीनची कम्युनिस्ट राजवट गेल्या वर्षभरात अधिक आक्रमक झाली असून आपले विस्तारवादी धोरण राबविण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. तैवानवर ताबा मिळविणे याचा पुढील टप्पा ठरतो. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते तसेच लष्करी अधिकार्‍यांनी तैवानवरील हल्ल्याची योजना तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर तैवानच्या हद्दीत वाढलेल्या घुसखोरीच्या घटनाही चीनच्या इराद्यांची जाणीव करून देणार्‍या ठरतात.

या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’ने आयोजित केलेल्या एका ऑनलाईन चर्चासत्रात अमेरिकी तसेच ऑस्ट्रेलियाच्या तज्ज्ञांनी चीन-तैवान युद्ध व ऑस्ट्रेलियाचा सहभाग या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘तैवानविरोधात चीन नक्की कोणत्या प्रकारचे बळ वापरेल याविषयी मतभेद आहेत. ग्रे झोन वॉरफेअर, दडपशाही, घुसखोरी, राजकीय संघर्ष असे अनेक पर्याय चीन वापरेल, असे सांगण्यात येते. मात्र अशा प्रकारच्या पर्यायांना तैवानची जनता दाद देणार नाही. चीनचे लष्कर तैवानमध्ये उतरल्याशिवाय चीनला तैवान ताब्यात घेता येणार नाही. त्यामुळे येत्या काही वर्षात चीन ऍम्फिबियस लॅण्डिंगच्या माध्यमातून तैवानमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करील’, असे स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीच्या विश्‍लेषक व तज्ज्ञ ओरियाना मॅस्ट्रो यांनी बजावले.

चीन-तैवान

‘ऑस्ट्रेलियातील काही जण अमेरिका नक्की काय करील? असा सवाल करताना दिसतात. तैवानवर हल्ला झाल्यास अमेरिका १०० टक्के या युद्धात उतरेल. चीनमधील काही गटांना तैवानच्या संघर्षात आपण अमेरिकेसह मित्रदेशांना भारी पडू, असे वाटत आहे. अमेरिका सर्वशक्तिनिशी प्रतिसाद देण्यापूर्वी कदाचित चीनची संरक्षणदले तैवानमध्ये पोचण्याची शक्यता आहे’, असे सांगून ही बाब लक्षात ठेवल्यास ऑस्ट्रेलियाला या युद्धात सहभागी होणे भाग पडेल, असा दावा मॅस्ट्रो यांनी केला.

‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’तील तज्ज्ञ निक बिस्ले यांनी, चीन-तैवान युद्ध येत्या पाच ते दहा वर्षात भडकण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, तैवानचा मुद्दा याच पिढीकडून निकालात काढला जाईल, असे बजावले आहे. ही बाब लक्षात घेता जिनपिंग यांच्या कारकिर्दीतच चीन-तैवान युद्ध होईल, याकडे बिस्ले यांनी लक्ष वेधले. ‘नॉर्दर्न ऑस्ट्रेलिया आशिया सोसायटी’तील विश्‍लेषक गाय बोकन्स्टेन यांनी, चीन-तैवान युद्ध पारंपारिक नसेल, तरीही ऑस्ट्रेलिया त्यात खेचला जाण्याची शक्यता १०० टक्के असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाची संरक्षणदले आकाराने लहान असली तरी युद्धासाठी सक्षम असल्याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली.

चीन-तैवान युद्धाबाबत ऑस्ट्रेलियन नेत्यांनीही यापूर्वी आक्रमक वक्तव्ये केली आहेत. एप्रिल महिन्यात, ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी, चीन व तैवानमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बजावले होते. तर गृह विभागाचे सचिव असणार्‍या मायकल पेझुलो यांनी, जवळच्या भागातून मोठ्या आवाजात युद्धाचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे, अशा शब्दात चीन-तैवान युद्धाची शक्यता वर्तविली होती. ऑस्ट्रेलियातील काही अधिकारी व नेत्यांनी तैवानच्या क्षेत्रात संघर्ष भडकल्यास ऑस्ट्रेलियाने अमेरिकी लष्कराला सहाय्य करावे, अशी स्पष्ट भूमिकाही मांडली होती.

त्यावर चीनने ऑस्ट्रेलियाला धमकावलेही होते. तैवानप्रकरणी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेच्या लष्कराला सहाय्य केल्यास चीन ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल, अशी धमकी चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने दिली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info