युक्रेनच्या मुद्यावरील तणाव विकोपाला गेल्यानंतरही अमेरिका-रशियामधील नवी बैठकही अपयशी ठरली

जीनिव्हा/वॉशिंग्टन/मॉस्को – शुक्रवारी जीनिव्हात पार पडलेल्या अमेरिका-रशिया बैठकीत कोणताही निर्णायक तोडगा निघण्यात अपयश आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, रशियाने युक्रेनवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याला जलदगतीने व आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. तर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी, रशिया कोणालाही घाबरत नाही अगदी अमेरिकेलाही नाही, अशा रशिया कोणत्याही दडपणाखाली झुकणार नसल्याचे बजावले.

अमेरिका - रशिया

रशियाने युक्रेन भागात नव्या व आक्रमक तैनातीला सुरुवात केल्याचे गेल्या महिन्यात समोर आले होते. त्यानंतर पाश्‍चात्य देशांनी आक्रमक पवित्रा घेत रशियावर कडक निर्बंध लादण्याचे तसेच युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविण्याचे इशारे दिले होते. पाश्‍चात्यांच्या या आक्रमक भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी ‘सिक्युरिटी पॅक्ट’चा प्रस्ताव दिला होता. त्यात युक्रेनला कोणत्याही परिस्थितीत नाटोचे सदस्यत्व देऊ नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली. अमेरिका व नाटोने ही मागणी नाकारली असली तरी त्यावर बोलणी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तीन बैठका पार पडल्या होत्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते.

शुक्रवारी जीनिव्हात पार पडलेली चर्चा याच बैठकांमधील पुढचा टप्पा मानला जातो. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास दीड तास चर्चा झाली. बैठकीदरम्यान, अमेरिकेने रशियाला लेखी प्रतिसाद देण्याची कबुली दिली असल्याचे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आले. पुढील आठवड्यात अमेरिका रशियाकडे लेखी प्रतिसाद सोपवेल, असे स्पष्ट करण्यात आले. त्याव्यतिरिक्त पुढील काळात राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग खुला ठेवण्यावर एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अमेरिका - रशिया

मात्र युक्रेन सीमेवरील तणावाच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. रशियाने युक्रेनवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याला अमेरिका व मित्रदेश तीव्र प्रत्युत्तर देतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. तर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री रिब्कोव्ह यांनी, रशिया कोणाच्याही दबावाखाली अथवा दडपणाखाली झुकणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, ब्रिटनने युक्रेनला २००० ‘अँटी टँक मिसाईल लॉंचर्स’ दिले असून काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे विमान शस्त्रसामुग्री घेऊन युक्रेनमध्ये दाखल झाले आहे. याव्यतिरिक्त ब्रिटनच्या ‘स्पेशल ऑपरेशन्स ब्रिगेड’चा भाग असणारी ३० जवानांची तुकडीही युक्रेनमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनकडून युक्रेनला ‘सर्व्हिलन्स ड्रोन्स’ही पाठविण्यात आल्याची माहिती ब्रिटीश माध्यमांनी दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info