तेल अविव/सना/काबुल – तालिबान अजूनही ‘अल कायदा’ व इतर दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवून असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने काही दिवसांपूर्वी दिला होता. पण तालिबानशी वाटाघाटी करणाऱ्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. आत्ता तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर जगभरातील दहशतवादी संघटना उघडपणे तालिबानचे समर्थन करू लागल्या आहेत. तसेच तालिबानने अफगाणिस्तानात वापरलेल्या ‘मॉडेल’चा इतर देशांमध्ये प्रयोग करण्याची धमकी या दहशतवादी संघटना देत आहेत. येमेन, सिरियातील अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनांनी तशा घोषणा केल्या आहेत.
अफगाणिस्तानातील गनी सरकार आणि अमेरिकी लष्कराची हकालपट्टी केली म्हणून जगभरातील दहशतवादी संघटना तालिबानची प्रशंसा करीत आहेत. यामध्ये अल कायदासंलग्न दहशतवादी संघटना सर्वात पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. येमेनमधील ‘अल कायदा इन अरेबियन पेनिन्सूला’, सिरियातील ‘हयात तहरिर अल-शाम’, ‘तुर्केस्तान इस्लामिक मुव्हमेंट’, पाकिस्तानातील ‘तेहरिक-ए-तालिबान’ आणि गाझापट्टीतील ‘हमास’ यांचा यात समावेश आहे.
‘इस्लामधर्मावर आधारीत कायदे आणि हक्कांच्या अंमलबजावणीसाठी, आक्रमणकर्ते व घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी जिहाद पुकारणे हाच वास्तववादी मार्ग असल्याचे तालिबानच्या या विजयाने सुस्पष्ट होत आहे’, अशी प्रतिक्रिया येमेनमधील अल कायदासंलग्न संघटनेने दिली. तालिबानच्या या संघर्षातून प्रेरणा घेऊन त्याचा वापर येमेनमध्ये करण्याचा इशारा येमेनमधील या संघटनेने दिला. तर सिरियातील अल कायदासंलग्न ‘हयात’ने तालिबान ही यापुढच्या संघर्षासाठी प्रेरणा असल्याचा दावा केला.
‘कितीही वेळ लागला तरी आक्रमकांच्या विरोधातील युद्धात आपलाच विजय होईल’, असे सांगून हयातने सिरियातील अस्साद राजवटीविरोधातील संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला. तालिबानने अफगाणिस्तानातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्यापासून सिरियातील हयातच्या हालचालींमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे इशारे इस्रायली व अमेरिकी विश्लेषकांनी दिले होते. अफगाणिस्तानातील विजयानंतर हमास, तुर्केस्तान इस्लामिक मुव्हमेंट आणि तेहरिक-ए-तालिबान या संघटनांनी देखील तालिबानचे कौतूक केले.
हमासने तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर आणि हमासचा नेता इस्माईल हनिया यांच्या कतारमधील भेटीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. मे महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या 11 दिवसांच्या संघर्षादरम्यान, बरादर आणि हनिया यांची भेट झाली होती, अशी माहिती हमासने दिली. गाझातील दहशतवादी संघटनेची तालिबानबरोबरची वाढती जवळीक इस्रायलसाठी धोकादायक असल्याचा इशारा इस्रायली माध्यमांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
दरम्यान, अफगाणिस्तानातील संघर्षात तालिबानचा विजय झाला तर अल कायदा पुन्हा एकदा उभी राहील आणि अमेरिकेवर 9/11 सारखे दहशतवादी हल्ले होतील, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला होता. पण याबाबत दिलेल्या अहवालांकडे बायडेन प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानच्या विजयानंतर येमेन, सिरिया, गाझापट्टीतील अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनांच्या वाढत्या हालचाली व धमक्या अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या इशाऱ्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |