गेल्या पाच महिन्यात रशियाने एक लाखाहून अधिक जवान गमावले

- अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाने गेल्या पाच महिन्यात जवळपास एक लाखाहून अधिक जवान गमावल्याचा दावा अमेरिकेने केला. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या पाच महिन्यांमध्ये रशियाच्या २० हजारांहून अधिक जवानांचा बळी गेला असून जवळपास ८० हजार गंभीर जखमी असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी फेटाळून लावली आहे.

एक लाखाहून अधिक जवान

रशिया-युक्रेन संघर्षाला १४ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. या काळात रशिया व युक्रेन या दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर लष्करी हानी सोसावी लागली आहे. युक्रेनसह पाश्चिमात्य देश व यंत्रणांनी रशियन लष्कराच्या हानीचे मोठमोठे आकडे सातत्याने प्रसिद्ध केले आहेत. तर रशियाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जवळपास सहा हजार जवानांचा संघर्षात बळी गेल्याचे जाहीर केले होते.

एक लाखाहून अधिक जवान

मात्र त्याचवेळी युक्रेनच्या हानीची माहिती देण्याचे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी सातत्याने टाळले आहे. त्याचवेळी रशियाने दिलेली माहिती विश्वसनीय नसल्याचे आरोपही केले आहेत. तर संरक्षणदलांची हानी हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मुद्दा असून युद्ध संपल्यावरच आपण माहिती उघड करू, अशी भूमिका युक्रेनच्या राजवटीने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियन जीवितहानीची माहिती देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

एक लाखाहून अधिक जवान

अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी, बाखमतसह डोन्बास क्षेत्रातील रशियाचे आक्रमण अपयशी ठरल्याचा दावा केला. हा दावा करताना बाखमतमधील संघर्षात रशियाला जबरदस्त किंमत मोजणे भाग पडल्याचेही सांगितले. ‘डोन्बासमधील मोहिमेत रशियाचा शस्त्रसाठा व लष्करी जवानांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षात जवळपास एक लाख जवान गमावले असून २० हजारांहून अधिक जवानांचा बळी गेला आहे. सुमारे ८० हजार जवान जखमी झाले आहेत. बळी गेलेल्या जवानांमध्ये ५० टक्के जवान वॅग्नर ग्रुपचे आहेत’, असा दावा किरबाय यांनी केला.

रशियाने योग्य प्रशिक्षण, शस्त्रसामुग्री व नेतृत्त्व न देताच हजारो जणांना युक्रेन संघर्षात ढकलल्याचा आरोपही ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’च्या प्रवक्त्यांनी केला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपण हा दावा करीत असल्याचेही किरबाय यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनीही रशियाच्या जीवितहानीबाबत दावे केले होते. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ महिन्यात रशियाने जवळपास एक लाख जवान गमावल्याचे जनरल मिले यांनी सांगितले होते.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info