अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयामुळे ब्रिटन, युरोपवरील 9/11सारख्या हल्ल्यांचा धोका वाढला

ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख, लष्करी अधिकारी व विश्‍लेषकांचा इशारा

लंडन – ‘यापुढे कायद्याचे राज्य नसलेल्या अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाश्‍चिमात्य देशांवर 9/11 सारखे हल्ले चढविण्याची संधी अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांना तालिबानच्या विजयामुळे मिळाली आहे. या दहशतवाद्यांना अमेरिकेवर हल्ले चढविणे जमले नाही, तर ते ब्रिटन किंवा इतर युरोपिय देशांमध्ये हल्ले घडवतील’, असा इशारा ब्रिटनच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिला. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांनी देखील युरोपवरील दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढल्याचे बजावले. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबरोबर जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत, ब्रिटनच्या माजी अधिकाऱ्यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

तालिबानचे अजूनही अल कायदाबरोबर सहकार्य असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला होता. अफगाणिस्तानच्या 15 प्रांतांमध्ये अल कायदा सक्रीय असून हे दहशतवादी तालिबानचा प्रमुख मुल्ला हैबतुल्ला अखुंदझदा याच्याशी संपर्कात आहेत. त्यामुळे तालिबानला अफगाणिस्तानात मिळालेला विजय हा फक्त तालिबान नाही तर अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी देखील विजय असल्याचा इशारा युरोपिय विश्‍लेषक देत आहेत. कारण यामुळे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा कायद्याचे राज्य नसेल. अफगाणिस्तानची भूमी दहशतवादी संघटनांची पैदास वाढविणारी बनेल, असे विश्‍लेषक बजावत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये पाश्‍चिमात्य देशांनी अफगाणिस्तानात उभारलेल्या लष्करी पायाभूत सुविधांचा तालिबान, अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांनी फायदा घेतला, तर त्याचा पाश्‍चिमात्य देशांना धोका संभवतो, अशी चिंता ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’चे माजी प्रमुख लॉर्ड जॉनथन इवान्स यांनी व्यक्त केली. तर अफगाणिस्तानचा वापर करून दहशतवादी अमेरिका किंवा शक्य झाल्यास ब्रिटन व युरोपिय देशांमध्ये 9/11 सारखे हल्ले चढवतील. यासाठी सरकारी इमारती, खेळाची मैदाने यांना दहशतवादी लक्ष्य करतील, असा इशारा ब्रिटनचे माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल रिचर्ड केंप यांनी दिला.

अफगाणिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलेले तसेच ब्रिटनचे नागरिकत्व असलेले दहशतवादी किंवा तालिबान, अल कायदाच्या ब्रिटनमधील समर्थकांकडून सर्वाधिक धोका असल्याचे कर्नल केंप यांनी ब्रिटिश वर्तमानपत्राला सांगितले. तालिबानचे नेते जगासमोर उदार चेहरा दाखवित असले व महिलांच्या अधिकारांचे जनत करण्याची घोषणा करीत असले तरी युरोपिय देशांनी त्याकडे अधिक सावधपणे पहावे, असा इशारा डॉ. हॅन्स-जेकब शिंडलर यांनी दिला. युरोपमधील आघाडीच्या वृत्तसंस्थेत लष्करी विश्‍लेषक असलेल्या डॉ. शिंडलर यांनी तालिबान व अल कायदा यांच्यातील सहकार्य कधीही मोडले जाणार नसल्याचा दावा केला.

तालिबानला अफगाणिस्तानात मिळालेला विजय हा ‘आयएस’ला इराक व सिरियामध्येही मिळू शकला नव्हता, असे तालिबानच्या समर्थकांना वाटत आहे. हीच युरोपिय देशांसाठी सर्वात धोक्याची घंटा ठरते, असे शिंडलर म्हणाले. तालिबान पाश्‍चिमात्य देशांना दिलेल्या आश्‍वासनांवर कायम राहणार नाही आणि येत्या काळात अफगाणिस्तानातून युरोपिय देशांवर दहशतवादी हल्ले केले जातील, अशी चिंता शिंडलर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, तालिबानच्या विजयामुळे दहशतीमध्ये असलेली अफगाणी नागरिक मोठ्या संख्येने युरोपिय देशांकडे निघाले आहेत. आपला देश निर्वासितांचे कोठार नसल्याचे सांगून तुर्कीने अफगाणींची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे अफगाणी निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये धडकण्याची भीती अधिकच बळावल्याची चिंता युरोपिय देशांना वाटत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info