चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने क्षेपणास्त्रांचा साठा वाढविण्यावर भर द्यावा

तैवानच्या माजी संरक्षणसचिवांचा सल्ला

तैपेई – चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने क्षेपणास्त्रांचे उत्पादन वाढवून त्याच्या साठ्यांमध्ये भर टाकावी, असा सल्ला माजी संरक्षणसचिव त्साई मिंग-सिन यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी चीनच्या सत्ताधारी राजवटीने तैवानला धमकावताना चिनी लष्कराने तैवानच्या दिशेने हजार क्षेपणास्त्रे रोखली आहेत, असे बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर माजी संरक्षणसचिवांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

हल्ल्याला प्रत्युत्तर

गेल्या दोन वर्षात चीनने तैवानविरोधातील धोरण अधिकाधिक आक्रमक करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी शांततेच्या मार्गाने तैवानच्या विलिनीकरणाबाबत बोलणारी सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट उघडपणे हल्ला चढवून तैवान ताब्यात घेण्याची भाषा बोलू लागली आहे. गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेले कोणत्याही प्रकारचे प्रयत्न ठाम निर्धारासह कारवाई करून हाणून पाडले जातील, असा इशारा देऊन तैवानचा मुद्दा चीनची कम्युनिस्ट राजवट कधीही सोडणार नाही, असे जिनपिंग यांनी बजावले होते.

हल्ल्याला प्रत्युत्तर

चीनकडून तैवानविरोधातील लष्करी मोहिमेची तयारीही जोरदारपणे सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रासह साऊथ चायना सीमध्ये जवळपास 100 ड्रिल्स केल्याची माहिती समोर आली आहे. तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. तैवानविरोधातील ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रताही वाढविण्यात आली असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांकडून तैवानच्या हद्दीत सातत्याने धडका मारणे सुरू आहे.

हल्ल्याला प्रत्युत्तर

चीनच्या या विस्तारवादी कारवाया अमेरिकेसह मित्रदेशांनी गांभीर्याने घेतल्या असून तैवानच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिका तसेच युरोपिय देशांच्या युद्धनौका तैवाननजिकच्या क्षेत्रात सातत्याने गस्त घालत आहेत. जपान व ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून उघडपणे तैवानच्या बाजूने उतरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेने नुकतीच तैवानला 40 ‘हॉवित्झर्स’ तोफांसह इतर शस्त्रे पुरविण्यास मंजुरी दिली. या पार्श्‍वभूमीवर तैवानने स्थानिक पातळीवरही शस्त्रनिर्मितीवर लक्ष केंद्रित केल्याचे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वीच तैवानने स्वदेशी बनावटीच्या पाणबुडी निर्मितीची घोषणा केली होती. तैवानकडून विनाशिकांचीही निर्मिती सुरू असून काही विनाशिका नौदलात सामीलही झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात तैवानने स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाची निर्मिती प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली होती.

त्यापाठोपाठ स्वदेशी बनावटीच्या तोफा व सशस्त्र वाहने विकसित करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेकडून ‘अँटी सबमरिन हेलिकॉप्टर्स’ घेण्याची तयारीही सुरू असल्याचा दावा तैवानमधील सूत्रांनी दिला आहे. त्यासाठी संरक्षणखर्चात तरदूत करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार तैवान अमेरिकेकडून 10 ‘एमएच-60आर सीहॉक’ ही हेलिकॉप्टर्स खरेदी करू शकते. ही सर्व तयारी सुरू असतानाच तैवानच्या माजी सचिवांनी क्षेपणास्त्रांची निर्मिती व तैनातीवर भर देण्याबाबत दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतो. माजी संरक्षणसचिव त्साई मिंग-सिन यांनी क्षेपणास्त्रांची तैनाती ‘असिमेट्रिक वॉरफेअर’च्या दृष्टिने महत्त्वाची ठरेल, असे बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info