काबुल विमानतळावर आयएसचे रॉकेट हल्ले – अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने हल्ले रोखले

हवाई सुरक्षा यंत्रणेने

काबुल – अमेरिकेच्या लष्कराने रविवारी काबुल विमानतळाजवळ ‘आयएस-खोरासन’च्या आत्मघाती हल्लेखोरांवर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा जण ठार झाले. यामध्ये पाच नागरिकांचा समावेश होता. अमेरिकेच्या या कारवाईला चोवीस तास उलटत नाही तोच सोमवारी सकाळी आयएसच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळाच्या दिशेने पाच रॉकेट्स डागले. विमानतळावर तैनात हवाई सुरक्षा यंत्रणेने हे रॉकेट्स यशस्वीरित्या भेदल्याचा दावा अमेरिकेने केला. दरम्यान, काबुल विमानतळावरील बचावकार्य बंद झाले असून तालिबानचे दहशतवादी विमानतळाच्या परिसराचा ताबा घेऊ लागले आहेत.

काबुल विमानतळावर

आयएसच्या दोनहून अधिक आत्मघाती हल्लेखोरांना ड्रोन हल्ल्यात ठार करून काबुल विमानतळावरील मोठा घातपात उधळून लावल्याचा दावा अमेरिकेने रविवारी केला होता. पण सोमवारी काबुलमधील सलिम कारवा भागात पार्क केलेल्या मोटारीतून विमानतळाच्या दिशेने रॉकेट हल्ले झाले. अमेरिकेने फार आधी काबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या ‘सी-रॅम’ यंत्रणेने यातील तीन रॉकेट्स यशस्वीरित्या भेदले. याशिवाय एक रॉकेट विमानतळाजवळील इमारतीवर तर दुसरे रॉकेट एका वाहनावर कोसळल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यात जीवितहानी झाली का, याची चौकशी सुरू आहे. आयएस-खोरासनने या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.

काबुल विमानतळावर

अमेरिकेच्या जवानांची एक तुकडी काबुल विमानतळावर तैनात असून येत्या काही तासात तेही माघार घेतील. यानंतर काबुल विमानतळाची जबाबदारी तालिबान व तुर्की किंवा कतारकडे असेल, असे दावे केले जातात. तुर्की आणि तालिबानमध्ये याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. पण गेल्या आठवड्यातच काबुल विमानतळावरुन माघार घेणाऱ्या तुर्कीने कतारबरोबर चर्चा सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे कतारचे जवान काबुल विमानतळावरील सुरक्षेची संयुक्त जबाबदारी घेऊ शकतात, असे बोलले जाते.

दरम्यान, रविवारी रात्री अमेरिका व नाटोच्या जवानांनी भरलेले विमान पाकिस्तानच्या इस्लामाबाद विमानतळावर उतरले होते. याचे फोटोग्राफ्स समोर आले होते. एक रात्र नाटोचे जवान इस्लामाबादमध्ये वास्तव्य करून होते. सोमवारी नाटोचे विमान युरोपिय देशांसाठी रवाना झाल्याचा दावा केला जातो. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या फोटोग्राफ्सबाबत पाकिस्तानच्या सरकारने माहिती दिलेली नाही.

लादेनचा सुरक्षाप्रमुख अफगाणिस्तानात दाखल

ओसामा बिन लादेनच्या सुरक्षेचा प्रमुख ‘अमिन-उल-हक’ हा अफगाणिस्तानात परतला आहे. त्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ माध्यमांमधून फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अल कायदा अफगाणिस्तानातून संपल्याचा दावा केला होता. पण अमिन-उल-हक परतल्यामुळे अल कायदा अजूनही शाबूत असून तालिबानबरोबर सहकार्य ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळील नांगरहार प्रांतातील राहत्या घरी अमिन-उल-हक परतला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेन काही काळासाठी तोरा-बोराच्या टेकड्यांमध्ये लपून बसला होता. त्यावेळी अमिन देखील ओसामाबरोबरच होता. अल कायदाच्या वरिष्ठ सदस्यांपैकी एक म्हणून अमिनचा उल्लेख केला जातो.

अल कायदाला संपविणे हे अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील हल्ल्याचे प्रमुख ध्येय होते. ते साध्य झाल्याने आता अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवण्याची आवश्‍यकता नाही, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. तसेच तालिबानने अल कायदाशी संबंध तोडल्याचेही राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. त्यांचे हे दोन्ही दावे अमिन-उल-हक याच्यामुळे पूर्णपणे निकालात निघाले आहेत. याचे फार मोठे राजकीय पडसाद अमेरिकेत उमटू शकतात.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info