उत्तर व दक्षिण कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या – कोरियन क्षेत्रातील तणाव वाढला

प्योनग्यँग/सेऊल – उत्तर कोरियाने बुधवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्याचे समोर आले आहे. या चाचण्यांपाठोपाठ दक्षिण कोरियानेही पाणबुडीतून डागता येणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे. आता उत्तर कोरियाच्या चिथावणीला कधीही प्रत्युत्तर देता येईल, अशी क्षमता दक्षिण कोरियाने मिळविली आहे, अशा शब्दात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी इशारा दिला आहे. एकाच दिवशी दोन्ही देशांनी केलेल्या चाचण्यांमुळे कोरियन क्षेत्रातील तणाव पुन्हा एकदा वाढल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

बॅलेस्टिक

तीन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आण्विक क्षमता असणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या ‘क्रूझ’ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. नवे क्षेपणास्त्र सुमारे दीड हजार किलोमीटर्सवरील लक्ष्याला भेदू शकते, असा दावा उत्तर कोरियाच्या माध्यमांकडून करण्यात आला होता. ही चाचणी म्हणजे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांनी अमेरिका व मित्रदेशांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. ही चाचणी संयुक्त राष्ट्रसंघाने टाकलेल्या निर्बंधांचे उल्लंघन असल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी उत्तर कोरियाने केलेल्या चाचणीतील क्षेपणास्त्राने जवळपास ८०० किलोमीटर्सचा टप्पा गाठल्याचे समोर आले आहे. हे क्षेपणास्त्र जपानच्या सागरी क्षेत्राचा भाग असलेल्या ‘सी ऑफ जपान’मध्ये पडल्याचा दावा जपानकडून करण्यात आला आहे. अमेरिका व दक्षिण कोरियाने चाचणीची पूर्ण माहिती घेणे सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी उत्तर कोरियाच्या मुद्यावरून चीन व दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची सेऊलमध्ये बैठक होती. त्याचवेळी ही चाचणी करून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आक्रमक हालचालींचे संकेत दिल्याचे दिसत आहे.

बॅलेस्टिक

उत्तर कोरियाच्या चाचणीनंतर काही तासातच दक्षिण कोरियाने आपल्या सागरी क्षेत्रात पाणबुडीवरून डागता येणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. दक्षिण कोरियाने या क्षेपणास्त्राचा पल्ला जाहीर केलेला नाही. मात्र पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारा दक्षिण कोरिया जगातील सातवा देश ठरला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी, उत्तर कोरियाच्या धोकादायक हालचालींविरोधात दक्षिण कोरिया नव्या शस्त्रांचा विकास सुरू ठेवेल, असे बजावले आहे. एकाच दिवशी उत्तर व दक्षिण कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

उत्तर कोरियाच्या चाचण्या व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे कोरियन क्षेत्रातील तणाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाल्याची चिंता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info