इराण, उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर अणुऊर्जा आयोगच्या प्रमुखांचा इशारा

इराण, उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर अणुऊर्जा आयोगच्या प्रमुखांचा इशारा

व्हिएन्ना – आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी इराण आणि उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर तीव्र चिंता व्यक्त केली. अणुकराराचे नियम मोडणार्‍या इराणवर विश्‍वास ठेवणे अवघड आहे. त्याचवेळी उत्तर कोरिया अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक प्लुटोनियमवर काम करीत असल्याचा इशारा ग्रॉसी यांनी दिला. पुढच्या काही आठवड्यात इराणबरोबर अणुकरार होईल, अशी आशा अमेरिकेचे बायडेन प्रशासन व्यक्त करीत आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी उत्तर कोरियासह इराणबाबत दिलेला हा दिलेला इशारा राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरत आहे.

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे सोमवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या मुख्यालयात 35 सदस्य देशांच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ची त्रैमासिक बैठक पार पडली. या बैठकीत आयोगाचे अध्यक्ष ग्रॉसी यांनी इराण आणि उत्तर कोरियाच्या आण्विक हालचाली चिंताजनक असल्याचे बजावले. गेल्या काही महिन्यांमध्ये इराणबरोबर काम करणे अतिशय अवघड बनले आहे. अणुप्रकल्पांच्या पाहणीवर इराणने टाकलेल्या मर्यादांचा संदर्भ देऊन ग्रॉसी यांनी हा दावा केला. इराणने आयोगाच्या निरिक्षकांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली खरी, पण अणुप्रकल्पात जाऊन प्रत्यक्ष निरिक्षण नोंदविण्यावर बंदी टाकली, याचा उल्लेख ग्रॉसी यांनी केला.

‘‘आयोगाच्या निरिक्षकांशी पूर्ण सहकार्य केले जाईल आणि तीन ठिकाणी सापडलेल्या ‘न्यूक्लिअर मटेरियल पार्टिकल्स’बद्दल आवश्यक खुलासा केला जाईल, असे इराणने मार्च महिन्यात मान्य केले होते. तसेच जून महिन्यापर्यंत हा प्रश्‍न निकालात निघेल, असे आश्‍वासन इराणने दिले होते. पण इराणने अणुऊर्जा आयोगाला दिलेली तात्पुरती मुदतवाढ 24 जून रोजी संपुष्टात येत आहे. अजूनही इराणने आयोगाच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. तसेच आपला अणुकार्यक्रम शांतीपूर्ण असल्याचे सिद्ध केलेले नाही. त्यामुळे इराणवर विश्‍वास ठेवणे अवघड बनले आहे’’, असा इशारा ग्रॉसी यांनी दिला.

तर उत्तर कोरियाच्या आण्विक हालचालींपासून ग्रॉसी यांनी जगाला सावध केले. 2009 साली उत्तर कोरियाने अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांची हकालपट्टी केली. तेव्हापासून उत्तर कोरियाच्या अणुप्रकल्पांचे निरिक्षण करता आलेले नाही. पण उत्तर कोरियाच्या अणुप्रकल्पाजवळील हालचाली व बांधकामे पाहता, हा देश अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक प्लुटोनियमवर काम करीत असल्याचा संशय ग्रॉसी यांनी व्यक्त केला. उत्तर कोरियाने दोन वर्षांपूर्वी योंगब्यॉन अणुप्रकल्प बंद केला असला तरी राजधानी प्योंगयांगजवळील कँग्सन येथील आण्विक हालचली फारच धोकादायक असल्याचे ग्रॉसी यांनी लक्षात आणून दिले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख ग्रॉसी यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत केलेली विधाने पूर्वग्रहदूषित आणि अवास्तव असल्याचा आरोप आयोगातील इराणचे विशेष दूत कझेम घरीबाबादी यांनी केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info