रशियावरील ‘ऑईल बॅन’च्या पार्श्‍वभूमीवर इंधनासह सोने व इतर धातूंचे दर कडाडले

धातूंचे दर कडाडले

मॉस्को/लंडन – अमेरिका व युरोपिय देशांमध्ये रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटले असून इंधन, सोने व इतर धातूंचे दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांनी प्रति बॅरल १३० डॉलर्सवर झेप घेतली असून २००८ सालानंतरची ही विक्रमी पातळी गाठली आहे. तर सोन्याचे दर प्रति औंस दोन हजार डॉलर्सवर पोहोचले आहेत. चांदी, पॅलाडियम, निकेल यांच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली असून निकेल १५ वर्षातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले.

या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईचा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. मात्र ही दरवाढ म्हणजे जगासमोर खडे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान नाही, तर याहूनही अधिक भीषण परिस्थितीचा सामना जगाला करावा लागेल. कारण सध्या १३० प्रति बॅरलवर असलेले कच्च्या तेलाचे दर बॅरलमागे २०० डॉलर्सवर जातील, असा जगाचा थरकाप उडविणारा इशारा लंडनच्या ‘वेस्टबेक कॅपिटल मॅनेजमेंट’ या ‘हेज फंड’ने दिला आहे.

धातूंचे दर कडाडले

रशिया-युक्रेन युद्धाला १२ दिवस पूर्ण होत असून या कालावधीत पाश्‍चिमात्य देशांनी रशियाविरोधात निर्बंधांचा धडाका कायम ठेवला आहे. रशियाविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याच्या दृष्टिने इंधन आयातीवर बंदी आणण्याचा पर्याय समोर आला आहे. युक्रेनकडून सातत्याने ही मागणी करण्यात येत असून युक्रेनचे रक्त सांडविण्यासाठी रशिया इंधनातून मिळालेल्या निधीचा वापर करीत आहे, असा आरोप युक्रेनच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांनी रशियन इंधन आयातीवर बंदी टाकण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.

याचे तीव्र पडसाद सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उमटले. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही अवधीतच कच्च्या तेलाच्या दरांनी मोठी झेप घेत थेट १३७ डॉलर्स प्रति बॅरलचा विक्रमी टप्पा गाठला. २००८ सालानंतर कच्च्या तेलाच्या दरांनी हा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या ‘डब्ल्यूटीआय क्रूड’चे दरही १२५ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. त्याचा फटका अमेरिकेतील इंधनाच्या किंमतींना बसला असून प्रति गॅलनमागे चार डॉलर्सहून अधिक मोजणे भाग पडत आहे.

धातूंचे दर कडाडले

कच्च्या तेलापाठोपाठ नैसर्गिक इंधनवायुच्या दरांनीही उसळी घेतली आहे. युरोपिय देशांमधील इंधनवायूचे दर ३६०० डॉलर्स प्रति हजार घनमीटरवर पोहोचले आहेत. इंधनवायू बाजारपेठेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही विक्रमी पातळी गाठण्यात आली आहे. इंधनापाठोपाठ सोने व इतर धातू तसेच अन्नधान्याचे दरही कडाडण्यास सुरुवात झाली आहे. सोन्याच्या दरांनी सोमवारी प्रति औंस दोन हजार डॉलर्सची पातळी ओलांडली. ऑगस्ट २०२०नंतर सोन्याने दोन हजारांची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सोन्यापाठोपाठ चांदी, निकेल, पॅलाडियम व ऍल्युमिनिअम या धातूंच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. निकेलचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढले असून १५ वर्षातील रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. पॅलाडियमचे दर ३,४४० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर ऍल्युमिनिअमच्या दरांनी टनामागे चार हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info