इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहोचला – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांचा अमेरिकेला इशारा

वॉशिंग्टन – ‘इराण अण्वस्त्रसज्जतेच्या अगदी निकट पोहोचला असून इस्रायलला याची तीव्र चिंता वाटत आहे. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी अमेरिकेने वाटाघाटींव्यतिरिक्त इतर पर्यायांचा वापर करावा’, अशा स्पष्ट शब्दात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी अमेरिकेला इशारा दिला. इराणने अतिशय वेगाने २० टक्के संवर्धित युरेनियमचा १२० किलो साठा जमा केल्याची नुकतीच घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

लॅपिड

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून त्यांनी मंगळवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांची भेट घेतली. या भेटीत लॅपिड यांनी इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या अगदी जवळ पोहोचल्याची आठवण करून दिली. मृदूभाषी म्हणून ओळखण्यात येणार्‍या लॅपिड यांनी सलिवन यांच्याबरोबरच्या भेटीत अगदी कठोर शब्दांचा वापर केल्याचा दावा इस्रायली माध्ममे करीत आहेत. यावरुन इराणच्या अणुकार्यक्रमातील घडामोडींवर इस्रायलला वाटत असलेली चिंता दिसून येते, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

लॅपिड यांनी सलिवन यांच्याबरोबरच्या भेटीत अणुकराराबाबत सुरू असलेल्या चर्चेवर असामाधान व्यक्त करून अमेरिकेने वेगळ्या पर्यायांचा वापर करायला हवा, अशी मागणी केली. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी देखील राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबरच्या भेटीत ‘प्लॅन बी’चा उल्लेख केला होता. तर बायडेन यांनी व्हिएन्ना येथील वाटाघाटींवर विश्‍वास व्यक्त केला होता.

लॅपिड

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सलिवन यांनी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन दिले. तर इराणबाबत अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील चर्चा यापुढेही सुरू राहतील, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बायडेन प्रशासन २०१५ सालचा अणुकरार पुन्हा लागू करण्यावर ठाम आहे. यासाठी व्हिएन्ना येथे चार महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. पण इराणमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर या वाटाघाटी स्थगित झाल्या असून नोव्हेंबर महिन्यात पुन्हा वाटाघाटी सुरू होतील, असा दावा केला जातो.

लॅपिड

बायडेन प्रशासनाने इराणसोबत सुरू करणार असलेल्या या वाटाघाटींवर अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी टीका केली. अणुकरारावर नव्याने चर्चा करुन बायडेन प्रशासन इराणला कुरवाळत असल्याचे ताशेरे पॉम्पिओ यांनी ओढले. यामुळे इराणला आपला अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी उत्तेजन मिळत असल्याचा आरोप अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. असेच सुरू राहिले तर इराणवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नसल्याचा इशारा पॉम्पिओ यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड लवकरच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतील. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. कुठलीही किंमत मोजावी लागली, तरी इस्रायल इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, असे इशारे इस्रायलने याआधी वेळोवेळी दिले होते. आवश्यकता भासली तर अमेरिकेच्या सहाय्याखेरीज इस्रायल इराणच्या विरोधात कारवाई करील, अशी धमकीही इस्रायली नेत्यांनी याआधी दिली होती. तर इस्रायलने अशी एकतर्फी कारवाई केलीच, तर बायडेन प्रशासन इस्रायलच्या सहाय्यासाठी पुढे येणार नाही, असे संकेत या प्रशासनाकडून दिले जात आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व इस्रायलमधील संबंध ताणले गेले असून इस्रायली नेत्यांच्या विधानांमधून ही बाब अधिक ठळकपणे समोर येऊ लागली आहे. त्याचवेळी माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांच्याप्रमाणे इस्रायलचे समर्थन करणार्‍या अमेरिकेतील नेते, माजी लष्करी व गुप्तचर अधिकारी व मुत्सद्यांमधील बायडेन प्रशासनाच्या इराणधार्जिण धोरणांविरोधातील संताप वाढत चालला आहे. याचा फार मोठा फटका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाला बसू शकतो.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info