जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट

जीनिव्हा – ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या वाढत्या फैलावामुळे कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला मिळालेले यश धुळीला मिळत असून जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ जगातील 111 देशांमध्ये फैलावला असून गेले चार आठवडे सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याकडे ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी लक्ष वेधले. ‘डब्ल्यूएचओ’ तिसर्‍या लाटेची जाणीव करुन देत असतानाच, ब्रिटनच्या प्रमुख वैद्यकीय संघटनेने ब्रिटीश सरकारच्या ‘अनलॉक’च्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात उडविलेला हाहाकार अद्यापही कायम आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू झाली आहे. जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या 40 लाखांवर गेली असून संसर्ग झालेल्यांची आकडेवारी 18.8 कोटींवर गेली आहे. अमेरिका व युरोपमधील अनेक देशांनी कोरोना साथीच्या काळात लागू केलेले निर्बंध शिथिलही करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून जगभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/who-warns-about-worldwide-third-wave-of-corona/