अफगाणिस्तानच्या प्रार्थनास्थळातील आत्मघाती स्फोटात ६० जणांचा बळी

काबुल – पाकिस्तानच्या सीमेजवळ असणार्‍या अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर शुक्रवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जणांचा बळी गेला. गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानातील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. पण तालिबानच्या राजवटीला आव्हान देणारी ‘आयएस-खोरासन’ ही दहशतवादी संघटना यामागे असल्याची शक्यता वर्तविली जाते. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने या हल्ल्याचा निषेध केला असून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असा दावा केला.

आत्मघाती

कंदहार प्रांताची राजधानी कंदहारमध्ये शुक्रवारी शियापंथियांच्या प्रार्थनास्थळात प्रचंड मोठा स्फोट झाला. आत्मघाती दहशतवाद्याने हा स्फोट घडविल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षदर्शींच्या मते दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी प्रार्थनास्थळाच्या मुख्या द्वारापाशी स्फोट घडविला. तर आणखी दोन दहशतवाद्यांनी प्रार्थनास्थळात घुसून आत्मघाती स्फोटाद्वारे स्वत:ला उडवून दिले. या स्फोटावेळी प्रार्थनास्थळात किमान ५०० जण होते. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली जाते.

ब्रिटिश वर्तमानपत्राने कंदहारमधील स्फोटात ६० हून अधिक जणांचा बळी गेला तर ७० जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. इराणमधील वृत्तसंस्था देखील बळींची संख्या ५० हून अधिक असल्याचा दावा करीत आहेत. तर अफगाणी वृत्तसंस्थेने ३७ जणांचा बळी गेल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षदर्शींनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेली चार आत्मघाती हल्लेखोरांची माहिती व या स्फोटानंतरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर बळींची संख्या ६० असल्याचे दावे केले जात आहेत.

आत्मघाती

गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानातील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावरील हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदूझ प्रांतातील प्रार्थनास्थळात झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान शंभर जणांचा बळी गेला होता. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीविरोधात संघर्ष पुकारणार्‍या ‘आयएस-खोरासन’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे कंदहारमधील स्फोटामागेही आयएस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिदने कंदहार प्रांतातील या स्फोटाचा निषेध केला. गेल्या आठवड्यातही तालिबानने शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याची फक्त निंदा केली होती. या स्फोटासाठी जबाबदार असलेल्या आयएसच्या विरोधात तालिबानने पावले उचलली नसल्याचा आरोप इराणचे नेते करीत आहेत. तालिबानने काबुलवर ताबा मिळविल्यापासून आयएसने तालिबानच्या राजवटीला आव्हान दिले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील आयएसच्या वाढत्या हल्ल्यांवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चिंता व्यक्त केली. इराक आणि सिरियातून अफगाणिस्तानात दाखल झालेले आयएसचे दहशतवादी मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांसाठी अनुकूल ठिकाण ठरण्याचा धोका वाढला आहे, असा इशारा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. पुढच्या आठवड्यात रशियामध्ये अफगाणिस्तानातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक होत आहे. या बैठकीत तालिबान देखील सहभागी होत असून सदस्य देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info