चिनी माध्यमांकडून तैवानला ‘डूम्सडे’ची धमकी – चीनच्या ‘पीएलए’कडूनही हाय अलर्टचा इशारा

बीजिंग/तैपेई – तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून चीन दिवसेंदिवस अधिकाधिक टोकाची भूमिका घेऊ लागल्याचे समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चीनची माध्यमे व ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने आक्रमक इशारे तसेच धमक्यांचे सत्र सुरू केले आहे. सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने तैवानला ‘डूम्सडे’ला तोंड द्यावे लागेल, अशी धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ चीनच्या संरक्षण विभागाने, तैवानविरोधातील कारवाईसाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ हाय अलर्टवर असल्याचा इशारा दिला.

‘डूम्सडे’

गेल्याच आठवड्यात एका कार्यक्रमात चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणावर वक्तव्य केले होते. ‘तैवानचे स्वातंत्र्य व विघटनवाद हा चीनला नवचैतन्य मिळवून देण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. चीनचे एकत्रीकरण वास्तवात उतरणार असून ते शांततापूर्ण मार्गाने घडविणे तैवानी जनतेच्या हिताचे असेल’, असे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले होते. या वक्तव्यावर तैवानमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. तैवानची जनता कोणत्याही दडपणासमोर झुकेल, अशा भ्रमातही कोणी राहू नये, असा इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिला होता. त्यानंतर चीनची माध्यमे व ‘पीएलए’देखील अधिक आक्रमक झाल्याचे समोर येत आहे.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर २४ तासांच्या अवधीत चीनने नवा युद्धसराव सुरू केल्याचे समोर आले होते. हा युद्धसराव तैवानवरील आक्रमणाच्या तयारीसाठीच असल्याचे दावेही सूत्रांकडून करण्यात आले होते. त्यानंतर ‘पीएलए’च्या विमानांनी पुन्हा एकदा तैवानच्या हद्दीत घिरट्या घालण्यासही सुरुवात केली होती. शुक्रवारी चीनच्या संरक्षणदलाकडून तैवानला नवा इशाराही देण्यात आला. या इशार्‍यात तैवानविरोधातील मोहिमेसाठी ‘पीएलए’ हाय अलर्टवर असल्याचे सांगण्यात आले. ‘चीनची संरक्षणदले तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थक व या मुद्यावर हस्तक्षेप करणार्‍या बाह्य शक्तींचा निर्णायक पराभव करतील’, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते तान केफेई यांनी बजावले.

‘डूम्सडे’

चीनच्या संरक्षणदलाकडून तैवान मुद्यावरून ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात येत असतानाच चिनी माध्यमेही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात, सरकारी मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने चीनसमोर युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसेल, अशी टोकाची भूमिका घेतली होती. आता तैवानला थेट ‘डूम्सडे’ची अर्थात संपूर्ण विनाशाची धमकी देण्यात आली आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून करण्यात येणारी वक्तव्ये म्हणजे तैवान मुद्यावर अंतिम तोडगा काढण्याची तयारी असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. यावेळी चीनकडे असलेल्या अण्वस्त्रक्षमतेचाही उल्लेख करण्यात आला असून, या अण्वस्त्रांमुळे अमेरिका तैवानच्या माध्यमातून चीनविरोधात लष्करी ब्लॅकमेल करु शकणार नाही, असेही ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात बजावण्यात आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली होती. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. लढाऊ विमानांच्या घुसखोरीव्यतिरिक्त चीनने तैवानवरील आक्रमणासाठी विविध भागांमध्ये सराव सुरू केल्याचे तसेच तैनाती वाढविल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञांनी संघर्षाचे भाकितही वर्तविले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info