‘जेनेटिक डेटाबेस’सह प्रगत तंत्रज्ञानात वर्चस्व मिळविण्यासाठी चीनच्या जोरदार हालचाली

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनची राजवट तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगभरातील नागरिकांचा ‘जेनेटिक डेटाबेस’ जमा करीत असून, ही बाब त्यांना अमेरिकेच्या आरोग्यक्षेत्रावर वर्चस्व तसेच लष्करी पातळीवर निर्णायक आघाडी देऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अमेरिकी यंत्रणांकडून अशा प्रकारचा इशारा देण्याची गेल्या महिन्याभरातील ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीकडे लक्ष वेधून अमेरिका याबाबतीत पिछाडीवर पडल्याचे बजावले होते.

‘जेनेटिक डेटाबेस’

चीनने गेल्याच दशकात महत्त्वाकांक्षी ‘मेड इन चायना पॉलिसी’ची घोषणा करून माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. ‘५जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्या व संशोधन मुसंडी मारत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. खनिजे व इतर कच्च्या मालाच्या उत्पादनात मिळविलेल्या वर्चस्वाच्या जोरावर चीन इतर देशांमधील तांत्रिक प्रगतीला वेठीस धरण्याच्या हालचाली करीत असल्याचेही संकेत मिळत आहेत.

‘जेनेटिक डेटाबेस’

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या या हालचालींची दखल घेऊन कम्युनिस्ट राजवटीला रोखण्यासाठी आक्रमक निर्णय घेतले होते. मात्र नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कारकिर्दीत घेण्यात आलेले अनेक निर्णय व कारवाया रद्द केल्या आहेत. चीनला रोखण्याऐवजी चिनी कंपन्यांना मोकळीक देऊन ड्रोन्सची खरेदी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, वरिष्ठ अधिकारी व यंत्रणा सातत्याने चीनच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधत आहेत. ‘नॅशनल काऊंटरइंटेलिजन्स ऍण्ड सिक्युरिटी सेंटर’चा इशाराही त्याचाच भाग ठरतो.

‘चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट जगभरातील नागरिकांची जनुकीय व आरोग्यविषयक माहिती जमा करीत आहे. ज्या देशाकडे अशा व्यापक स्वरुपात माहिती उपलब्ध असेल तो भविष्यातील साथींवर प्रभावी उपचार शोधू शकेल. चीनने या क्षेत्रात आधीच आघाडी मिळविली आहे’, असे ‘नॅशनल काऊंटरइंटेलिजन्स ऍण्ड सिक्युरिटी सेंटर’चे वरिष्ठ अधिकारी एडवर्ड यू यांनी बजावले. कोरोनाची ‘टेस्टकिट्स’, जनुकीय चाचणीचे तंत्रज्ञान तसेच अमेरिका व युरोपातील औषध तसेच जैवतंत्रज्ञान कंपन्यात गुंतवणूक यासारख्या माध्यमातून चीन हे साध्य करीत असल्याचा दावाही यू यांनी केला. असेच चालू राहिले तर भविष्यात आरोग्य क्षेत्रात अमेरिकेला चीनवर अवलंबून राहण्याची नामुष्की ओढवेल, याची जाणीवही वरिष्ठ अधिकार्‍यांनी करून दिली.

‘जेनेटिक डेटाबेस’

‘नॅशनल काऊंटरइंटेलिजन्स ऍण्ड सिक्युरिटी सेंटर’चे हंगामी संचालक मायकल ओरलॅण्डो यांनी आरोग्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाकडे लक्ष वेधले. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’, ‘ऑटोनॉमस सिस्टिम्स’, ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’, ‘सेमीकंडक्टर्स’ यासारख्या क्षेत्रात चीनने आघाडी घेतली तर अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’सारख्या क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांनी चीनला सहकार्य केले तर त्याचा फटका गुप्तचर यंत्रणांना बसू शकतो, असा दावाही ओरलॅण्डो यांनी केला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या या अहवालापूर्वी माजी ‘चीफ सॉफ्टवेअर ऑफिसर’ निकोलस चायलन तसेच ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’च्या प्रमुख हैदी ग्रँट यांनी, अमेरिकेकडून तंत्रज्ञान क्षेत्राकडे होणार्‍या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केला होता.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’सह इतर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने अमेरिकेवर आधीच मात केली आहे, असा इशारा निकोलस चायलन यांनी दिला होता. तर ग्रँट यांनी अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देश जगातील इतर देशांना खुलेआम प्रगत तंत्रज्ञान पुरवित असल्याचे बजावले होते. यामुळे प्रतिस्पर्धी देशांना इतर देशांच्या संवेदनशील क्षेत्रातील माहिती सहज मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info