वॉशिंग्टन – तैवानला असणारा चिनी आक्रमणाचा धोका अधिक तीव्र झाला आहे, असा इशारा अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी एल्ब्रिज कोल्बी यांनी दिला. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनीही एका मुलाखतीत याची कबुली दिली असून, अमेरिका तैवानचे रक्षण करील असा विश्वास व्यक्त केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही चीन तैवानवर जबरदस्ती करीत असून त्यामुळे या क्षेत्रातील स्थैर्य धोक्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. यावर, चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून अमेरिकेने चीनला कमी लेखण्याचा प्रयत्न करु नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.
गेल्या वर्षभरात चीनची कम्युनिस्ट राजवट तैवानविरोधात अधिकाधिक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे समोर येत आहे. तैवानच्या हद्दीत अधिकाधिक लढाऊ व टेहळणी विमाने घुसविणे, सातत्याने तैवानविरोधात युद्धसरावांचे आयोजन, लष्करी अधिकारी व सरकारी मुखपत्रांकडून देण्यात येणार्या धमक्या, तैवानच्या मुद्यावरून इतर देशांना देण्यात येणारे इशारे या माध्यमातून चीन तैवानबाबत टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. चीनच्या या वाढत्या आक्रमकतेमुळे विविध देशांमधील अधिकारी तसेच तज्ज्ञांकडून सातत्याने चीन-तैवान युद्धाचे इशारे देण्यात येत आहेत. कोल्बी यांचा इशाराही त्याचाच भाग ठरतो.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत कोल्बी यांनी संरक्षण विभागात ‘डेप्युटी असिस्टंट सेके्रटरी’ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या दैनिकात लिहिलेल्या एका लेखात चीनकडून तैवानवर होणार्या आक्रमणाची तीव्रता अधिक वाढल्याचा इशारा दिला आहे. ‘द फाईट फॉर तैवान कुड कम सून’ असे त्यांच्या लेखाचे शीर्षक असून, चीन हा सर्वात नजिकचा धोका आहे, याची जाणीव बायडेन प्रशासनाला व्हायला हवी असे बजावले आहे. तसे झाले नाही तर युद्ध व युद्धात पराभवाचा धोका आहे, असा दावा कोल्बी यांनी केला.
चीनकडून तैवानवर होणारे आक्रमण इतरांच्या अपेक्षा व भाकितांपेक्षा अधिक लवकर होऊ शकते, याकडे माजी संरक्षण अधिकार्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी तीन कारणांचाही उल्लेख केला आहे. चीनकडून सातत्याने तैवानबाबत देंण्यात येणार्या धमक्या व सुरू असलेले व्यापक युद्धसराव हे पहिले कारण आहे. गेल्या २५ वर्षात चीनने संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणासाठी केलेला खर्च व तैवानवरील हल्ल्यासाठी मिळवलेली क्षमता, हे दुसरे कारण असल्याचे कोल्बी यांनी म्हटले आहे.
तैवानविरोधात यशस्वी लष्करी मोहिमेसाठी कमी वेळ असल्याची भावना चीनच्या सत्ताधारी राजवटीत वाढीला लागली असून, आंतरराष्ट्रीय समुदायाची या क्षेत्रातील सज्जता पूर्ण होण्यापूर्वी हल्ला करण्याची मागणी मूळ धरत आहे, हे तिसरे कारण असल्याचा दावा अमेरिकी अधिकार्यांनी केला. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनीही तैवानला असणारा चीनचा धोका अधिक प्रबळ झाल्याकडे लक्ष वेधले होते. मॅक्मास्टर यांनी पुढील १२ महिने तैवानसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असे एका कार्यक्रमात बजावले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही बुधवारी ‘आसियन’बरोबरील बैठकीत चीनच्या तैवानविरोधातील कारवाया वाढल्याचा दावा केला. चीन तैवानविरोधात जबरदस्ती करीत असून, या क्षेत्रातील शांतता व स्थैर्य धोक्यात आल्याचे बायडेन म्हणाले. दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनीही चीनचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याची कबुली दिली आहे. अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली देतानाच तैवानमध्ये अमेरिकी लष्करी पथक तैनात असल्याची माहितीही राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिली. त्याचवेळी, चीनने तैवानवर हल्ला चढविल्यास अमेरिका रक्षण करेल, असा विश्वास असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.
तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या वक्तव्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेने चीनच्या निर्धाराला कमी लेखण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने अण्वस्त्रस्पर्धेचा उल्लेख केला असून, अमेरिकेला एका धक्क्यात नष्ट करता येईल अशी आण्विक क्षमता चीन मिळवेल, असे बजावले आहे. तसेच चीनने आपल्या सामर्थ्याचा वापर करण्याचा निर्णय घेतलाच तर चीनमध्ये सामील होणे हाच एकमेव पर्याय तैवानसमो असेल, अशी दर्पोक्ती ग्लोबल टाईम्सने केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |