चीन लवकरच तैवानवर हल्ला चढविल – ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा गंभीर इशारा

तैवानवर हल्ला

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – ‘लवकरच चीन तैवानवर हल्ला चढविल. ज्याचा विचारही केला गेला नसेल, अशा गोष्टीसाठी आपण तयार राहण्याची गरज आहे’, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकार्‍यांनी देखील तैवानवरील चीनच्या आक्रमणाचा धोका वाढल्याचे बजावले होते. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनी आपल्या देशात अमेरिकेचे सैन्य तैनात असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. यावर संतापलेल्या चीनने तैवानचा ताबा घेण्यासाठी निर्णायक हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी माजी पंतप्रधान अबॉट यांनी तैवानचा ऐतिहासिक दौरा करून चीनच्या तैवानविरोधी आक्रमक कारवायांवर टीका केली होती. तैवानच्या मुद्यावरुन ऑस्ट्रेलिया युद्धाचे नगारे वाजवित नसून चीनची धोरणेच त्या स्वरुपाची असल्याचा ठपका अबॉट यांनी ठेवला होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांच्या या तैवान दौर्‍यानंतर खवळलेल्या चीनने द्विपक्षीय संबंध तोडण्याची धमकी दिली होती. तसेच यासाठी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्के सहन करावे लागतील, असे धमकावले होते.

तैवानवर हल्ला

पण तैवानच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक समर्थनाची मागणी करणार्‍या अबॉट यांनी चीनच्या धमक्यांना अजिबात किंमत दिलेली नाही. अमेरिकेतील ‘विल्सन सेंटर’ येथील कार्यक्रमात बोलतानाही अबॉट यांनी चीनच्या इराद्यांपासून लोकशाहीवादी देशांना सावध केले. ‘तैवानची कोंडी करून गुडघ्यांवर आणण्याचा चीन प्रयत्न करील किंवा मोठ्या प्रमाणात हल्ला चढवून चीन तैवानचा ताबा घेईल’, असे अबॉट यांनी बजावले.

चीनने हॉंगकॉंगचा ताबा घेतला तेव्हा पाश्‍चिमात्य देशांनी नरमाईची भूमिका घेतली होती. यामुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची धिटाई वाढली आहे. हॉंगकॉंगप्रमाणे तैवानचा ताबा घेणे चीनसाठी सोपे ठरणार नाही. यासाठी चीनला लष्करी बळाचा वापर करावा लागेल. पण यावेळी लोकशाहीवादी देशांना तैवानच्या मागे उभे रहावेच लागेल’, असे सांगून अबॉट यांनी हॉंगकॉंगबाबतच्या चुकीची पुनरावृत्ती टाळण्याचे आवाहन केले.

तैवानवर हल्ला

तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनने निर्णायक हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने किनारपट्टीवरील शहर उद्ध्वस्त करणारी चाचणी घेतली होती. ही चाचणी म्हणजे तैवान तसेच अमेरिकेसाठी इशारा असल्याचे बोलले जाते. त्यानंतर सलग दोन दिवस चीनकडून तैवानला धमक्या दिल्या जात आहेत. चीनमध्ये विलिनीकरणाशिवाय तैवानला दुसरे भवितव्य नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी बजावले आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये तैवानला सहभागी करून घेण्याच्या अमेरिकेच्या मागणीवरही वँग ई यांनी टीका केली.

दरम्यान, तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू हे सध्या युरोपिय देशांच्या दौर्‍यावर आहेत. युरोपिय महासंघाने तैवानबरोबरील संबंध अधिक मजबूत करावे, अशी मागणी तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. तसेच चीनवर पूर्णपणे अवलंबून राहणार्‍या देशांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज आहे, असा इशारा वू यांनी दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info