तैवानबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना अतिरिक्त ‘वॉर पॉवर्स’

बीजिंग – तैवान मुद्यावरून असलेला तणाव वाढत असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्धविषयक हालचालींसाठी अतिरिक्त अधिकार देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. जपानी दैनिकाने हे वृत्त दिले असून त्यात युद्धासाठी जमवाजमव करताना जिनपिंग यांना संसदेची परवानगी घ्यायला लागणार नाही, असे सांगण्यात येते. दरम्यान, चीनच्या राजवटीने तैवानवरील आक्रमणासाठी हालचालींना वेग दिला आहे. चीनच्या काही शहरांमधून रणगाडे तसेच सशस्त्र वाहने तैवानच्या क्षेत्रानजिक रवाना करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

‘वॉर पॉवर्स’, चीनचे राष्ट्राध्यक्ष, जिनपिंग

चीनकडून गेल्या काही महिन्यात, तैवानविरोधातील धोरण अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात तैवानचे विलिनीकरण चीनमध्ये होणारच, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर चीनमध्ये लष्करी तसेच इतर पातळ्यांवरही हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. जिनपिंग यांना देण्यात आलेले अतिरिक्त अधिकारही त्याचाच भाग दिसत आहे.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या नव्या अधिकारांनुसार, युद्धाच्या काळात लष्करासाठी अतिरिक्त भरती करण्यासाठी त्यांना कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. यासंदर्भात सध्या असलेल्या नियमांमध्ये जिनपिंग त्यांना हवे तसे बदल करु शकणार आहेत. आता अचानक असे अधिकार देण्यामागे नव्या युद्धाची तयारी हेच कारण असू शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात ‘साऊथ चायना सी’ व ‘ईस्ट चायना सी’मधील लष्करी हालचाली तसेच भारताच्या सीमेवरील संघर्ष यात जिनपिंग यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घातले होते, असा दावा केला होता.

‘वॉर पॉवर्स’, चीनचे राष्ट्राध्यक्ष, जिनपिंग

या पार्श्‍वभूमीवर, तैवानसंदर्भात चाललेली तयारी व नवे अधिकार लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना ‘वॉर पॉवर्स’ दिल्या जात असतानाच चीनच्या लष्करानेही जोरदार तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या काही शहरांमधून तैवाननजिक असलेल्या क्षेत्रात रणगाडे व सशस्त्र वाहने मोठ्या प्रमाणात पाठविण्यात आल्याची माहिती उघड होत आहे. चीनमधील सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओज प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात चीनच्या एका वृत्तवाहिनीने ‘रोरो’ सेवेसाठी वापरण्यात येणार्‍या बोटींमधून रणगाड्यांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती दिली होती. तैवान क्षेत्रातील संघर्षाचा सराव म्हणून चीनने अमेरिकी युद्धनौकांची ‘मॉकअप मॉडेल्स’ तयार केल्याचे वृत्तही देण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये तैवानच्या हवाईहद्दीत चिनी विमानांची घुसखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसात चीनच्या २० विमानांनी तैवानच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली आहे. गेल्या महिन्यात, चीनने तैवानच्या हद्दीत २०० हून अधिक विमाने घुसवून तैवानवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info