वॉशिंग्टन/बीजिंग – चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्राच्या संकटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढू शकतो व त्याचा फटका अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल, असा इशारा अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने दिला आहे. चीनच्या यंत्रणांनी काही उपाययोजना केल्या असल्या तरी आर्थिक संकटाची तीव्रता वाढण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असे फेडरल रिझर्व्हने बजावले. अमेरिकेतील काही वित्तसंस्था व अभ्यासगटांनी चीनमधल्या ‘रिअल इस्टेट क्रायसिस’ची तुलना अमेरिकेतील गृहकर्ज संकटाशी करून मंदीची भीती व्यक्त केली होती.
गेल्या वर्षभरात चीनच्या मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’चे समभाग ८० टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सची कर्जे असून ती फेडण्यास कंपनी सक्षम नसल्याचे दावे करण्यात येत आहेत. कंपनीवर असणार्या एकूण कर्जांपैकी तीन कर्जांची परतफेड करण्यास कंपनीला आधीच अपयश आले आहे. या कंपनीपाठोपाठ ‘फँटॅसिआ’, ‘सिनिक होल्डिंग्ज्’ व ‘मॉडर्न लॅण्ड’ यासारख्या कंपन्यांनीही कर्ज बुडित जाण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘कैसा ग्रुप होल्डिंग्ज्’ कंपनीने कर्जदारांकडे अधिक वेळ मागितला असून पतसंस्थांनी कंपनीचे मानांकन घसरल्याचे जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘फेडरल रिझर्व्ह’कडून आलेला इशारा लक्षवेधी ठरतो. ‘चीनची अर्थव्यवस्था व वित्तक्षेत्राची व्याप्ती पाहता निधी उभारण्यात येणार्या अडचणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तणाव वाढवू शकतात. चीनमधील वित्तीय बाजारपेठेत निर्माण झालेले संकट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था धोक्यात आणू शकते व त्याचा फटका अमेरिकेलाही बसू शकतो. चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण झालेले संकट हे या क्षेत्रातील कर्जबाजारी कंपन्यांवर सुरू झालेली कारवाई व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अडचणी यामुळे उद्भवले आहे’, असे फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट व संबंधित क्षेत्राचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. दुसर्या बाजूला चीनच्या बँकांनी दिलेल्या कर्जांमध्ये सर्वाधिक बुडीत कर्जेही याच क्षेत्रातील असल्याचे समोर येत आहे. २०२१ साली चीनच्या कंपन्यांनी बुडविलेल्या कर्ज व व्याजाची रक्कम सुमारे नऊ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यातील ३४ वाटा इतका हिस्सा रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचे पतमानांकन कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था तसेच विश्लेषकांनी नव्या संकटाचे इशारे देण्यासही सुरुवात केली आहे.
‘एव्हरग्रॅन्ड’ दिवाळखोरीत गेल्यास कर्जरोख्यांच्या बाजारपेठेत अराजकसदृश स्थिती निर्माण होईल, असे ब्रिटीश विश्लेषकांनी बजावले आहे. अमेरिकेच्या ‘द स्ट्रीट’ या वेबसाईटने ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट चीनसाठी ‘लेहमन मुमेन्ट’ (अमेरिका व जगावर कोसळलेल्या २००८ सालच्या आर्थिक संकटाची सुरूवात) ठरेल, असा दावा केला. तर अमेरिकी गुंतवणूकदार व विश्लेषक जिम चॅनोस यांनी ‘एव्हरग्रॅन्ड’चे संकट अमेरिकेच्या ‘लेहमन ब्रदर्स’पेक्षा अधिक मोठा हादरा देणारे असू शकते, अशी भीती व्यक्त केली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |