इस्रायलबरोबर करार करून युएईने इस्लामी जगताचा विश्वासघात केला आहे – इराणचे सर्वोच्च नेते खामेनी

तेहरान – ‘इस्रायलबरोबर करार करून यूएईने इस्लामी जगताचा, अरब देशांचा आणि पॅलेस्टाईनचा विश्वासघात केला आहे. पण हा विश्वासघात फार काळ टिकणार नाही’, अशी धमकी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खोमेनी यांनी दिली. खामेनी यांच्या धमकीवर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इस्लामचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा असेल, तर चीनची सत्ताधारी राजवट उघुरवंशीय इस्लामधर्मियांना संपवते आहे याकडेही लक्ष द्या, असा टोला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इराणला लगावला आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या पुढाकाराने इस्रायल व यूएईमध्ये (संयुक्त अरब अमिरात) ऐतिहासिक शांतीकरार झाला होता. या कराराचे अनेक देशांकडून स्वागत झाले असून, इस्रायलशी सहकार्य नसलेले अनेक अरब-इस्लामी देश देखील सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे संकेत देत आहेत. मात्र इराण व तुर्की या देशांनी या कराराविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून इस्रायल व युएईला धमकावण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) इस्रायलबरोबर केलेला ऐतिहासिक शांतीकरार सर्वात मोठी चूक असून येणारा काळ ’युएई’साठी धोकादायक असेल, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिला होता. इराणी राष्ट्राध्यक्षांच्या या इशाऱ्यानंतर युएईने आक्रमक भूमिका घेत इराणच्या राजदूतांना समन्सही बजावले होते. या पार्श्वभूमीवर खामेनी यांनी दिलेली धमकी लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिका व इस्रायलचे संयुक्त शिष्टमंडळ यूएईमध्ये दाखल झाल्याचा घटनेवर प्रतिक्रिया देताना इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी युएईला धमकावले. ‘पॅलेस्टाईन सध्या प्रचंड दबावाखाली आहे. असे असतानाच यूएईने इस्रायल व अमेरिकेच्या एजंट्सबरोबर करार केला. ही घटना म्हणजे इस्लामी जगताच्या हितसंबंधांविरोधात प्रदर्शित केलेले क्रौर्य ठरते’, अशा शब्दात खामेनी यांनी युएईला फटकारले.

खामेनी यांनी युएईवर केलेल्या टीकेनंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या द्वेषाच्या विचारसरणीचा सर्व जगाने निषेध करायला हवा. शांततेची चाहूल लागल्याने इस्लामधर्मीय, ख्रिस्तीधर्मीय व ज्यूधर्मीय आनंद साजरा करीत आहेत. मात्र त्याच वेळी खामनी हिंसेसाठी चिथावणी देत आहेत. अशा स्थितीत ,युएई व इतर देशांच्या पाठीशी अमेरिका ठामपणे उभी राहील’, अशी ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी दिली. त्याचवेळी युएईवर विश्वासघाताचा आरोप करणाऱ्या खामेनीनाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले.

‘चीनची राजवट इस्लामधर्मीय उघुरवंशीयांना संपवित आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून इस्लामधर्मीयांना देण्यात येणाऱ्या या क्रूर वागणुकीविरोधातही तुम्ही आवाज उठवाल याची मी प्रतिक्षा करीत आहे’, असा टोला पॉम्पिओ यांनी इराणला लगावला.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info