सप्लाय चेन क्रायसिस, इंधनाचे दर व कोरोनामुळे जर्मन अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसण्याची शक्यता

बर्लिन – युरोपमधील सर्वात मोठी व प्रमुख अर्थव्यवस्था असणार्‍या जर्मनीला आर्थिक पातळीवर एकापाठोपाठ एक फटके बसण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षी मंदावलेली जर्मन अर्थव्यवस्था यावर्षी अवघी २.७ टक्के इतकाच विकासदर गाठू शकेल, असे भाकित जर्मनीतील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी केले आहे. त्याचवेळी जर्मन सरकारकडे उपलब्ध असलेल्या निधीची स्थिती गंभीर असल्याचा अहवाल ‘फेडरल ऑडिट ऑफिस’ने दिला आहे. जर्मनी ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याने त्याला बसणारे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम घडविणारे ठरु शकतात, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

इंधनाचे दर

गेल्या वर्षी कोरोना साथीच्या उद्रेकामुळे जर्मन अर्थव्यवस्थेत तब्बल ४.९ टक्के इतकी घसरण झाली होती. मात्र या वर्षाच्या सुरुवातीपासून जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्र हळुहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फायदा जर्मन अर्थव्यवस्थेलाही होत असल्याचे संकेत मिळाले होते. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असे भाकित तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांनी केले होते. मात्र गेल्या काही महिन्यात त्याला पुन्हा एकदा धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे.

जर्मनी ही उत्पादन व निर्यातप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येते. वाहने, मशिनरी, रसायने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने व औषधे यांचे उत्पादन तसेच निर्यात हा जर्मन अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. २०१९ साली जर्मनीच्या ‘जीडीपी’मध्ये ४० टक्के वाटा निर्यातीचा होता. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर लादण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ व इतर निर्बंधांमुळे जर्मनीतील उत्पादन व निर्यातप्रधान अर्थचक्राला मोठे धक्के बसू लागले आहेत.

इंधनाचे दर

जर्मनीतील औद्योगिक क्षेत्राचा निर्देशांक सलग चार महिने घसरत असल्याची माहिती समोर आली आहे. या घसरणीमागे जागतिक स्तरावर निर्माण झालेले पुरवठा साखळीतील संकट हा प्रमुख घटक ठरला आहे. या संकटामुळे जर्मन कंपन्यांना उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल मिळण्यात अडथळे येत आहेत. त्याचवेळी तयार झालेले उत्पादन योग्य वेळेत पोहोचण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दुसर्‍या बाजूला इंधनाचे दर वाढल्याने वीज महाग झाली आहे. काही भागांमध्ये वीजटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अनेक मोठ्या जर्मन कंपन्यांनी आपली युनिट्स बंद करण्यास सुरुवात केली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा तसेच वीजेची टंचाई यामुळे ऑर्डर्स पूर्ण करता येत नसल्याची नाराजी जर्मन उद्योजक व्यक्त करीत आहेत. दुहेरी संकटामुळे उत्पादनावर परिणाम होत असतानाच जर्मनीत कोरोनाचा उद्रेक तीव्र होत असल्याचे गेल्या काही आठवड्यात समोर आले आहे. त्याचा परिणाम अंतर्गत मागणीवर होण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे.

इंधनाचे दर

काही अर्थतज्ज्ञ तसेच माध्यमांनी जर्मनीला ‘बॉटलनेक रिसेशन’चा फटका बसू शकतो, असे भाकित केले आहे. जर्मन अर्थव्यवस्थेसंदर्भात समोर येणारी इतर माहितीही त्याला दुजोरा देणारी ठरत आहे. जर्मनीच्या ‘फेडरल ऑडिट ऑफिस’ने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात, सरकारकडे उपलब्ध असणार्‍या निधीची स्थिती गंभीर असल्याचे मत नोंदविले आहे. सरकारकडील निधीचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी पुढील सरकारने तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे, असा सल्ला ‘फेडरल ऑडिट ऑफिस’ने दिला आहे.

हीच स्थिती कायम राहिली तर यावर्षी जर्मनीची नोंद मागे पडलेली युरोपिय अर्थव्यवस्था अशी होऊ शकते, असा दावा होल्गर श्मिडिंग या अर्थतज्ज्ञांनी केला आहे. ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’च्या ऑलिव्हिर रकाव यांनी जर्मन अर्थव्यवस्थेच्या मंदावण्यामागे कोरोनाची साथ हा महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे म्हटले आहे. ‘अलायन्झ’मधील तज्ज्ञ कॅथरिना उटरमॉल यांनी, जर्मनीतल महागाई गेल्या तीन दशकांमधील सर्वोच्च पातळीवर असल्याकडे लक्ष वेधले असून हा घटकही अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक ठरु शकतो, याची जाणीव करून दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info