वॉशिंग्टन/बीजिंग – चीनची कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सीवर ताबा मिळविण्यासाठी ‘मेरिटाईम मिलिशिआ’चा आक्रमक वापर करीत आहे, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला आहे. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक ऍण्ड इंटरनॅशनल स्टडिज्’ (सीएसआयएस) या अभ्यासगटाने चीनच्या कारवायांसंदर्भात विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘वेस्ट फिलिपाईन सी’ भागात चीनच्या मिलिशिआकडून जवळपास ३०० जहाजे सातत्याने गस्त घालताना आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. शी जिनपिंग यांनी चीनची सूत्रे हाती घेतल्यानंतर मिलिशिआचा आकार व कारवाया अधिक वाढल्याकडेही अभ्यासगटाने लक्ष वेधले आहे.
‘पुलिंग बॅक द कर्टन ऑन चायनाज् मेरिटाईम मिलिशिआ’ असे अहवालाचे नाव असून त्यात मिलिशिआच्या पार्श्वभूमीपासून ते सध्याच्या कारवायांपर्यंत माहिती देण्यात आली आहे. चीनने १९७०च्या दशकापासून ‘मेरिटाईम मिलिशिआ’चा वापर सुरू केला होता व त्याच्या जोरावरच व्हिएतनामकडून ‘पॅरासेल आयलंड’ हिसकावून घेण्यात आल्याची आठवण अमेरिकी अभ्यासगटाने करून दिली. त्यानंतर काही दशके साऊथ चायना सीमधील परदेशी जहाजांना अडथळे आणण्याचे काम करणार्या मिलिशिआला, जिनपिंग यांच्या काळात अधिक आक्रमक स्वरुप देण्यात आले. मिलिशिआचा आकार मोठा करून त्यांना सरकारकडून देण्यात येणार्या सुविधा व अनुदानातही वाढ करण्यात आली, असे अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षात चीनच्या मिलिशिआच्या हालचाली प्रचंड प्रमाणात वाढल्याची जाणीव अभ्यासगटाने करून दिली. साऊथ चायना सीचा भाग असणार्या ‘वेस्ट फिलिपाईन सी’ भागात मिलिशिआचा भाग असणारी जवळपास ३०० जहाजे सातत्याने गस्त घालत असतात, असे ‘सीएसआयएस’ने स्पष्ट केले. आपल्या माहितीच्या समर्थनार्थ अमेरिकी अभ्यासगटाने सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. यात चीनच्या बंदरांमध्ये उभ्या असणार्या जहाजांचाही समावेश आहे. त्याचवेळी चीनचे अधिकारी तसेच सरकारी माध्यमांमध्ये मिलिशिआसंदर्भात प्रसिद्ध होणार्या वक्तव्यांचाही दाखलाही दिला आहे.
‘स्प्राटले आयलंड’ व नजिकच्या छोट्या बेटांच्या भागात चीनच्या मिलिशिआचा वापर वाढल्याचा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला. मिलिशिआतील जहाजे एकाच वेळी एकत्र व विखुरलेल्या स्थितीत मोठ्या भागात अनेक दिवसांसाठी तैनात रहात असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. चीनचा हा मिलिशिआ ‘ग्रे झोन टॅक्टिक्स’चा भाग असून या माध्यमातून चीन शेजारी देशांवर प्रचंड दडपण आणत असल्याचे अभ्यासगटाने बजावले आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया व इंडोनेशिया या आग्नेय आशियाई देशांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचेही ‘सीएसआयएस’ने म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |